बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) मंगळवार दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी विवा कॉलेज माणगाव आयोजित पुरस्कार वितरण सोहळा २०२६ कार्यक्रमांतर्गत शिवश्री भूषण राजाराम सिसोदे यांना विवा कॉलेज माणगाव तर्फे राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. माणगाव येथील शिवश्री भूषण राजाराम सिसोदे हे गेली अनेक वर्षे निरंतरपणे माणगाव तालुक्याच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात आणि समाजसेवेत कार्यरत असलेले एक निःस्वार्थ आणि निर्भीड व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. समाजातील सर्वसामान्य नागरिकांना सरकारी दवाखान्यातील अडचणी असोत वा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून होणारा त्रास अशा प्रत्येक समस्येसाठी ते स्वतः धावून जातात आणि मदतीसाठी नेहमीच हिरीरीने पुढाकार घेतात.
लहान पणापासूनच इतिहास विषयक अभ्यासाची विशेष आवड असल्याने त्यांनी वृत्तपत्रांमधून लेखनाला सुरुवात केली. इयत्ता अकरावीमध्ये असतानाच त्यांच्या लेखनामुळे त्यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला होता; मात्र न्यायालयातून ते निर्दोष मुक्त झाले. या घटनेनंतर त्यांची ओळख चळवळीचा कार्यकर्ता व इतिहास अभ्यासक म्हणून अधिक दृढ झाली.
शिवश्री सिसोदे यांनी संभाजी ब्रिगेड या संघटनेचे जिल्हाध्यक्षपद भूषवले असून त्या माध्यमातून अनेक सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबवले. तसेच जिजाऊ जन्मोत्सव समितीची स्थापना करून जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली. शक्ति शिवराज्य अभिषेक समिती आणि ६ जून राज्याभिषेक समितीचे ते सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. समाज हितासाठी लढा देताना त्यांनी कारावास देखील भोगलेला आहे. निर्भीडपणा, स्पष्टवक्तेपणा आणि अन्यायाविरुद्ध उघड भूमिका हीच त्यांची खरी ओळख बनली आहे. सध्या ते महाराष्ट्र पोलीस क्राईम रिपोर्टर म्हणून कार्य करत असून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम सातत्याने करत आहेत.
शिवश्री भूषण राजाराम सिसोदे यांच्या लोककल्याणकारी सामाजिक कार्याची दखल घेत विवा कॉलेज तर्फे त्यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या मित्र परिवार आणि हितचिंतका कडून त्यांच्यावर सोशल मीडियाच्या वॉट्स अप, फेसबुक, इन्स्टाग्राम इत्यादी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणि त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा रुपी अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.
















