धाराशिव दि.२७ जानेवारी (जिमाका) राज्य शासनाने प्रशासनात अधिक पारदर्शकता, गतिमानता निर्माण व्हावी तसेच नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शासकीय उपक्रम व सुविधांचा थेट लाभ जनतेपर्यंत पोहोचावा,या उद्देशाने १५० दिवसांचा विशेष कृती कार्यक्रम राबविला.या कार्यक्रमांतर्गत सर्व उपक्रम प्रभावीपणे व गुणवत्तापूर्ण रीतीने अंमलात आणण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याने राज्यात तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांच्या कुशल नेतृत्व व दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली १५० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार धाराशिव जिल्ह्यात प्रशासन अधिक सक्षम,तंत्रज्ञानस्नेही व नागरिककेंद्रित करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण प्रणाली विकसित करण्यात आल्या.यामध्ये डिस्ट्रिक्ट डॅशबोर्ड प्रणाली,तुळजाई चॅटबॉट, कल्पवृक्ष – स्मार्ट जीआर प्रणाली तसेच जीवनरेखा प्रणाली या महत्त्वाच्या डिजिटल उपक्रमांचा समावेश आहे.
डिस्ट्रिक्ट डॅशबोर्ड प्रणालीद्वारे जिल्ह्यातील विविध विभागांच्या शासकीय योजनांचा एकत्रित आढावा घेणे सुलभ झाले आहे.या प्रणालीमुळे योजनांची उद्दिष्टपूर्ती, प्रगतीवर सतत लक्ष ठेवणे व वेळेत पाठपुरावा करणे अधिक कार्यक्षम पद्धतीने शक्य झाले असून प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेला गती मिळाली आहे.
तुळजाई चॅटबॉट – ही प्रणाली नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहे.या माध्यमातून पुरवठा विभाग, संजय गांधी योजना, नैसर्गिक आपत्ती,आपले सरकार सेवा केंद्रावरील सेवा याबाबतची माहिती काही क्षणांत उपलब्ध होते.जिल्हा संकेतस्थळाशी संलग्न असलेल्या या प्रणालीवरून नागरिक घरबसल्या आवश्यक कागदपत्रांची माहिती, योजना पात्रता तसेच शंकांचे तात्काळ निरसन करू शकतात. मोबाईल,लॅपटॉप किंवा संगणकावर सहज वापरता येणाऱ्या या सुविधेमुळे नागरिकांचा वेळ व खर्च वाचून प्रशासन अधिक गतिमान झाले आहे.
कल्पवृक्ष – स्मार्ट जीआर प्रणाली ही शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहे.शासन निर्णय,कायदे, परिपत्रके यांची एकत्रित व अद्ययावत माहिती उपलब्ध करून देणाऱ्या या प्रणालीमुळे प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ,अचूक व जलद झाले आहे.जीवनरेखा प्रणाली ही शेत रस्त्यांशी संबंधित एक महत्त्वाची डिजिटल व्यवस्था असून, जिल्ह्यातील सर्व गट नंबर व सर्वे नंबरनिहाय शेत रस्त्यांची नोंद या प्रणालीत करण्यात आली आहे. त्यामुळे शेत रस्त्यांबाबतच्या तक्रारी, नागरिकांचे प्रश्न,तसेच रस्ता उपलब्धतेसाठीचे अर्ज यांचे प्रभावी निराकरण शक्य झाले असून ग्रामीण भागातील विकासाला मोठी चालना मिळत आहे.
यासोबतच ई-ऑफिस प्रणालीचा जास्तीत जास्त वापर केल्यामुळे पेपरलेस कार्यालय ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत असून, शासकीय कामकाजाचा निपटारा जलद व पारदर्शक पद्धतीने होत आहे.या सर्व उपक्रमांचा थेट लाभ जिल्ह्यातील नागरिकांना मिळत असून,सेवा वितरण अधिक सुलभ, जलद व विश्वासार्ह झाले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल राज्यभरातून कौतुक होत असून पालकमंत्री श्री.प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांचा सत्कार करून जिल्हा प्रशासनाच्या कार्याचे विशेष कौतुक केले.भविष्यात धाराशिव जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी प्रयत्न करण्याच्या शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी श्रीमती ज्योती पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी श्री.विद्याचरण कडवकर,उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्री.शिरीष यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती स्वाती शेंडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्री. प्रविण धरमकर,उपजिल्हाधिकारी (मध्यम प्रकल्प क्र. २) श्री.संतोष राऊत,उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) श्रीमती अरुणा गायकवाड, उपजिल्हाधिकारी (मांजरा प्रकल्प) श्री.श्रीकांत पाटील,सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भूम श्री.रेवैयाह डोंगरे (भा.प्र.से.), उपविभागीय अधिकारी धाराशिव श्री.ओंकार देशमुख, उमरगा श्री.दत्तू शेवाळे,कळंब श्री. गणेश शिंदे,सर्व तालुका तहसीलदार, महसूल तहसीलदार श्री.प्रकाश व्हटकर,सर्व नायब तहसीलदार, जिल्हा सूचना व विज्ञान केंद्र अधिकारी श्री.अंकीत सिंग,सीएम फेलो श्री.मनोज नाईकवाडी, श्री.रणधिरसिंह भोसले,जीआयओ श्री.विश्वजीत साखरे,जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक श्री.तानाजी हंगरगेकर, सीनियर नेटवर्क इंजिनियर श्री.बंडू गाडे,श्री.अमोल कांबळे तसेच जिल्ह्यातील सर्व सहायक महसूल अधिकारी,महसूल सहायक,मंडळ अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी ते महसूल सेवक यांनी या यशासाठी सांघिक प्रयत्न केले.
या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल जिल्हाधिकारी श्री. कीर्ती किरण पुजार यांनी विशेष कौतुक केले.तसेच प्रशासनात Artificial Intelligence (AI) सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आल्याचे नमूद करून नागरिकांनी या सर्व डिजिटल सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले. १५० दिवसांचा हा उपक्रम धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मैलाचा दगड ठरत असून,भविष्यात जिल्ह्याच्या प्रगतीला नवी दिशा देणारा ठरणार आहे.
















