मुंबई :– महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाबद्दल आज देशाच्या राजकीय वर्तुळातून तीव्र शोक व्यक्त करण्यात आला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पवार यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक कार्याचा गौरव करत त्यांना आदरांजली वाहिली.
*राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची शोकसंवेदना
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, ‘बारामती येथील विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याचे वृत्त अत्यंत क्लेशदायक आहे. त्यांचे अकाली जाणे हे राज्याच्या विकासासाठी नुकसानकारक आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीत, विशेषतः सहकारी क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान ऐतिहासिक आहे. ‘
*पंतप्रधान नरेंद्र मोदींची श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात अजित पवार यांच्या संदर्भातील आठवणींना उजाळा दिला. पंतप्रधान म्हणाले, “अजित पवार हे जमिनीशी जोडलेले नेतृत्व होते. महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर असणारे कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखले जायचे. त्यांची प्रशासकीय कामांची जाण आणि गरिबांच्या कल्याणाची तळमळ उल्लेखनीय होती. त्यांचे निधन धक्कादायक आहे.
*लोकसभेत शोकप्रस्ताव आणि आदरांजली
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अजित पवार यांच्या निधनाबाबत शोकप्रस्ताव मांडला. त्यात अध्यक्षांनी नमूद केले की, “अजित पवार १० व्या लोकसभेचे सन्माननीय सदस्य होते. सहा वेळा उपमुख्यमंत्री आणि आठ वेळा विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली पकड निर्माण केली होती. सार्वजनिक जीवनातील त्यांची बांधिलकी सदैव स्मरणीय राहील.” यानंतर संपूर्ण सभागृहाने दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली.
















