सिल्लोड( प्रतिनिधी)जागतिक वारसास्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजिंठा लेणी नंतर दुर्लक्षित असलेल्या जंजाळा परिसरातील ऐतिहासिक घटोत्कच लेणीला आता नवसंजीवनी मिळणार असून, राज्य पुरातत्त्व विभागाने या सहाव्या शतकातील लेणीच्या जतन व संवर्धनासाठी सविस्तर प्रस्ताव व अंदाजपत्रक तयार केले आहे.
येत्या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता असून, यामुळे वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या अमूल्य वारशाला नव्या तेजाची झळाळी मिळणार आहे.
सिल्लोड तालुक्यातील जंजाळा (नानेगाव) गावाजवळ वसलेली घटोत्कच लेणी अजिंठा लेणीपासून अंतर सुमारे २७ किलोमीटर अंतरावर असून, ती राज्य संरक्षित स्मारकांच्या यादीत समाविष्ट आहे. मात्र, अद्यापपर्यंत पुरेशा संवर्धनाअभावी लेणीची भिंतचित्रे, शिल्पकला व वास्तुरचना झिजत चालली होती. इतिहासप्रेमी, अभ्यासक व स्थानिक नागरिकांकडून सातत्याने संवर्धनाची मागणी होत होती. अखेर त्या मागणीला प्रतिसाद देत राज्य पुरातत्त्व विभागाने लेणी संवर्धनाला प्राधान्य दिले आहे.
घटोत्कच लेणी ही महायान पंथातील पहिल्या व महत्त्वाच्या लेणींपैकी एक मानली जाते. आकाराने अजिंठा लेणीपेक्षा लहान असली तरी धार्मिक, ऐतिहासिक व स्थापत्यदृष्ट्या तिचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. येथील विहाररचना, स्तंभशिल्पे व बुद्धमूर्ती तत्कालीन बौद्ध स्थापत्यकलेचा समृद्ध वारसा दर्शवितात. त्यामुळे या लेणीचे जतन केवळ पर्यटनासाठी नव्हे, तर सांस्कृतिक इतिहासाच्या संरक्षणासाठीही अत्यावश्यक असल्याचे पुरातत्त्व तज्ज्ञांचे मत आहे.
लेणीतील विहार चौकोनी आकाराचा असून त्यात एकूण वीस अष्टकोनी स्तंभ आहेत. प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागात सहा अष्टकोनी स्तंभ असलेला व्हरांडा आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस कोरलेली दोन स्त्री शिल्पे तत्कालीन सौंदर्यदृष्टीचे दर्शन घडवितात. एका स्तंभावर वरच्या भागात कोरलेला स्तूप विशेष लक्ष वेधून घेतो. विहाराच्या मागील भागात तीन गर्भगृहे असून, मधले मुख्य गर्भगृह आकाराने मोठे आहे. येथे तथागत भगवान बुद्ध यांचे भव्य शिल्प कोरलेले आहे, तर डाव्या बाजूस उपगाभाऱ्यात जोडलेली लहान खोली आढळते.
घटोत्कच लेणीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वाकाटक नरेश हरिसेन याचा प्रधान वराहदेव याचा एकवीस ओळींचा शिलालेख. हा शिलालेख तत्कालीन राजकीय, सामाजिक व धार्मिक इतिहासाची मौल्यवान माहिती देणारा मानला जातो. इतिहास अभ्यासकांसाठी हा शिलालेख संशोधनाचा महत्त्वाचा स्रोत ठरतो. त्यामुळे संवर्धनाच्या कामात शिलालेख संरक्षणालाही विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.
पर्यटनाच्या दृष्टीने मात्र ही लेणी आजही दुर्लक्षितच आहेत. स्थानिक नागरिकांखेरीज येथे पर्यटकांचा फारसा राबता नसतो. लेणीपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे अडीच किलोमीटरची पायपीट करावी लागते. रस्ते, दिशादर्शक फलक, सुरक्षितता व्यवस्था व मूलभूत सुविधा नसल्यामुळे अनेक पर्यटक येथे येण्याचे टाळतात. काही पर्यटन संस्था व सामाजिक संघटनांनी अभ्यास सहली, स्वच्छता मोहीम व जनजागृती उपक्रम राबविले असले तरी, शासकीय पातळीवर ठोस विकास आराखड्याची गरज कायम होती.
आता प्रस्तावित संवर्धन प्रकल्पामुळे लेणीची संरचनात्मक मजबुती, शिल्पांचे संरक्षण, पाण्यामुळे होणारी झीज रोखणे, स्वच्छता, तसेच पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. पुढील टप्प्यात या परिसराचा समावेश अधिक व्यापक पर्यटन मार्गिकेत करण्याचाही विचार शासन स्तरावर सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे अजिंठा पर्यटनावर अवलंबून असलेला परिसर घटोत्कच लेणीपर्यंत विस्तारण्याची संधी निर्माण होणार आहे.
‘अजिंठाच्या सावलीत राहिलेला घटोत्कच लेणीसारखा मौल्यवान वारसा आता स्वतंत्र ओळख निर्माण करेल,’ अशी अपेक्षा इतिहासप्रेमी व्यक्त करत आहेत. संवर्धनानंतर ही लेणी अभ्यासक, पर्यटक व विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल, तसेच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
•सहाव्या शतकातील दुर्लक्षित वारसा
•संवर्धनासाठी महत्त्वाकांक्षी प्रस्ताव















