छत्रपती संभाजीनगर : महावितरणच्या आवाहनास प्रतिसाद देत ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनतर्फे (एरिया) भारतीय समाज सेवा केंद्रास 10 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प भेट देण्यात आला. या प्रकल्पाचे उद्घाटन महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्या हस्ते 26 जानेवारीस करण्यात आले.
यावेळी ‘एरिया’चे जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील, निसर्गोपचारतज्ञ डॉ.योगिता कछोट, केंद्राच्या संचालक छाया पवार, कार्यकारी अभियंता राजेंद्र नाहटा, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रत्येक सोलर एजन्सीने सामाजिक बांधिलकी म्हणून गरजू व्यक्ती व सामाजिक संस्थांना सौर प्रकल्प मोफत बसवून देण्याचे आवाहन मुख्य अभियंता कछोट यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत ‘एरिया’च्या वतीने सौर प्रकल्प भेट देण्यात आला. यासाठी जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील व त्यांच्या 29 सभासदांनी पुढाकार घेतला. यामुळे या भारतीय समाज सेवा केंद्राचा वीजबिलावर दर महिन्यास होणारा 20 ते 25 हजारांचा खर्च वाचणार आहे.
यावेळी मुख्य अभियंता कछोट यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त् ध्वजारोहण करण्यात आले. यापुढेही अशा गरजू व्यक्ती व संस्थांना सौर संचाच्या माध्यमातून मदत करण्यात ‘एरिया’च्या पुढाकार घेईल, अशी अपेक्षा व्यक्त करून कछोट यांनी या सामाजिक उपक्रमाबद्दल संघटनेचे कौतुक केले. संचालिका छाया पवार यांनी प्रकल्पासाठी मदत केल्याबद्दल महावितरण व ‘एरिया’चे आभार मानले.















