छत्रपती संभाजीनगर:स्कूल ऑफ अॅलाइड हेल्थ सायन्सेस,दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (डीएमआयएचईआर), अभिमत विद्यापीठ, वर्धा आणि नागपूर ने शैक्षणिक वर्ष 2026–27 पासून पदवी (अंडर ग्रॅज्युएट) अॅलाइड हेल्थ सायन्सेस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) पात्रता अनिवार्य केल्याची घोषणा केली आहे. हा निर्णय नॅशनल कमिशन फॉर अॅलाइड अँड हेल्थकेअर प्रोफेशन्स (एनसीएएचपी) यांच्या नव्या नियमावलीनुसार घेण्यात आला आहे.
सन 2017 पासून, स्कूल अॅलाइड हेल्थ सायन्सेस क्षेत्रात दर्जेदार शिक्षण देत असून सध्या 25 पदवी आणि 14 पदव्युत्तर अभ्यासक्रम राबवित आहे. प्रशिक्षित आरोग्यसेवा व्यावसायिकांची वाढती गरज लक्षात घेऊन हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. शैक्षणिक वर्ष 2025–26 पर्यंत प्रवेश प्रक्रिया डीएमआयएचईआर तर्फे आयोजित स्वतंत्र प्रवेश परीक्षेद्वारे केली जात होती.
मात्र, एनसीएएचपी च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व संस्थांना आयोगाने निर्धारित केलेला अभ्यासक्रम स्वीकारणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासोबतच, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत घेतली जाणारी नीट परीक्षा पदवी अभ्यासंक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य करण्यात आली आहे, ज्यामुळे देशभरात पारदर्शक, गुणवत्ताधारित आणि एकसमान प्रवेश प्रक्रिया सुनिश्चित होईल.
या संदर्भात बोलताना स्कूल ऑफ अॅलाइड हेल्थ सायन्सेसचे अधिष्ठाता डॉ. सुनील थिटमे यांनी अॅलाइड हेल्थ सायन्सेस क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नीट परीक्षेला बसण्याचे आवाहन केले आहे. ही परीक्षा आता प्रवेशासाठी आवश्यक पात्रता निकष ठरणार असून यामुळे राष्ट्रीय स्तरावर पारदर्शकता आणि गुणवत्तेला प्राधान्य मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
पुढे बोलताना डॉ. थिटमे यांनी सांगितले की, एनसीएएचपी निर्धारित अभ्यासक्रम आणि नीट-आधारित प्रवेश प्रक्रियेच्या अंमलबजावणीमुळे शिक्षणाची गुणवत्ता, व्यावसायिक कौशल्ये आणि पदवीधरांची रोजगार क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल.
प्रवेश प्रक्रियेबाबतच्या अधिकृत सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वांसाठी विद्यार्थी आणि पालकांनी विद्यापीठाच्या अधिकृत अधिसूचना नियमितपणे तपासाव्यात, असेही आवाहन करण्यात आले आहे.
















