मुंबई, दि. 27 :- यंदाच्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची मुख्य संकल्पना ‘जागर बोली भाषांचा’ ही आहे. मराठी भाषेमध्ये २१६ बोली भाषा आणि ३५ परकीय भाषांतील शब्द रूढ झाले असून, यामुळे मराठी ही सतत विकसित आणि समृद्ध होत जाणारी भाषा ठरत असल्याचे प्रतिपादन मत मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
मंत्रालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत पदनिर्देशित सर्व मराठी भाषा अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मराठी भाषा संचालनालयाचे संचालक अरूण गीते, वित्त विभागाचे सहसचिव शिंदे व पदनिर्देशित मराठी भाषा अधिकारी उपस्थित होते.
राजभाषा म्हणजे अवघड संकल्पना नाही. शासन निर्णय आणि परिपत्रक सामान्य नागरिकांना समजतील अशा सोप्या भाषेत असावेत, हाच खरा राजभाषेचा आत्मा आहे. या कार्यशाळेतून राज्यातील दोन-अडीच लाख मराठी भाषा अधिकारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. याअंतर्गत दर महिन्याला ऑनलाईन मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठी भाषेबाबत जाणीवजागृती नवी लाट निर्माण होईल, अशी अपेक्षा श्री कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
संचालक गीते यांनी महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ मधील विविध तरतुदींचे सविस्तर सादरीकरण केले. तसेच मराठी भाषा अधिकारी यांचे कार्य, जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांविषयी सखोल मार्गदर्शन केले. या सादरीकरणाद्वारे शासन व्यवहारात मराठी भाषेचा प्रभावी वापर वाढविणे. तसेच अधिनियमाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींवर उपाय याबाबतही मार्गदर्शन केले.
सहा प्राध्यापक स्वप्निल जोशी यांनी मराठी भाषेतील विविध मनोरंजनात्मक खेळांच्या माध्यमातून मराठी भाषेच्या वैविध्याचा आनंद दिला. सूत्रसंचालन वासंती काळे यांनी केले.
















