सोयगाव दि.२९ (प्रतिनिधी) सोयगाव परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा कलिंगड (टरबुज) पिकाची लागवड केली आहे; मात्र सध्या या पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर फलधारणेचा अभाव दिसून येत असून, यामागे बदलते हवामान आणि नैसर्गिक परागीकरण करणाऱ्या मधमाशांची कमतरता हे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. परिणामी वेलीवर आलेली फुले सुकून गळत असल्याने शेतकरी चिंतित आहे.गेल्या पाच वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे गहू, हरभरा, मका, आदी पिकांनी अपेक्षित उत्पादन दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणांचा वापर करत केळी, टरबुज, खरबूज यांसारख्यापिकांकडे मोर्चा वळविला. मोठा खर्च आणि मेहनत घेऊन पिकांची जोपासना केली जात असतानाच, वातावरणातील बदलांमुळे फवारणीचा खर्च वाढला आहे. त्यातच गेल्या वर्षापासून मधमाशांचा अभाव हे नवे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. पूर्वी शेतातील झाडांवर मधमाशांची नैसर्गिक पोळी आढळत असत. मध गोळा करण्यासाठी या मधमाशा टरबुज व खरबूज पिकांच्या फुलांवर घोंगावत असताना नैसर्गिकरीत्या परागीकरणाची प्रक्रिया पूर्ण होत असे; मात्र सध्या मधमाशांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याने निसर्गचक्र बिघडले असून, त्याचा थेट परिणाम फलधारणेवर होत आहे.
प्रतिक्रिया;-नाविन्यपूर्ण प्रयोगात यंदा मोठा खर्च करून टरबुज पिकाची लागवड केली. दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला, मात्र वेलीवर फळधारणा होत नाही. फुले सुकून पडत आहेत. संभाव्य नुकसान लक्षात घेता शासनाने नुकसानभरपाईपोटी मदत द्यावी.
ईश्वर सपकाळ, शेतकरी, तिडका.
कोट-१)वातावरणातील बदल आणि नैसर्गिक परागीकरणासाठी मधमाशांचा अभाव ही प्रमुख कारणे सध्या दिसून येत आहेत. शेतकऱ्यांनी पिकांवर फवारणी करताना केवळ शिफारस केलेल्या घटकांचाच वापर करावा.
















