सोयगाव दि.२९ (प्रतिनिधी) तालुक्यातील जिल्हा परिषदेचे तीन गट आणि पंचायत समितीच्या सहा गणांसाठी प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चित झाले आहेत. त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते आपल्या उमेदवाराच्या प्रचारात उतरले आहेत. गावागावात उमेदवारांकडून बैठका घेतल्या जात आहेत तसेच गावकऱ्यांना विविध आश्वासने उमेदवार देत आहेत. आपणच समस्या सोडवू शकतो, असा दावा उमेदवार करू लागले आहेत.अनेक वर्षापासून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर पडल्यानंतर ग्रामीण भागात निवडणुकीची उत्सुकता होती. तसेच आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी गट आणि गणांतील गावांचा दौरा करून प्रचाराला सुरुवात केली होती. परंतु, पक्षाकडून अधिकृत उमेदवारी घोषित झाल्यानंतर अनेक उमेदवारांनी मंगळवारीपासून गट व गणांतील गावांचा दौरा करून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी सुरू केल्या आहेत. तसेच कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. प्रमुख पक्षाच्या कार्यकर्त्याच्या बैठका घेतल्या जात असून, रणनीती आखली जात आहे. जिल्हा परिषदेच्या तीन जागांसाठी भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), बसप,एम आय एम ,वंचित बहुजन आघाडी आदी पक्षांसह अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर पंचायत समितीच्या सहा जागांसाठी प्रमुख राजकीय पक्षांसह काही अपक्ष उमेदवार आहेत. परंतु, राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराची धुरा कार्यकर्त्याच्या खांद्यावर सोपवली आहे.सकाळीच गट व गणांतील गावात जाऊन देवदर्शन व मतदारांचे उमेदवार चरणस्पर्श करू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात सकाळीच विविध पक्षांचे उमेदवार वाहनांच्या ताफ्यासह दाखल होत आहेत. अनेक उमेदवारांना पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कसरत करावी लागली आहे तर काहींनी यापूर्वीच उमेदवारी निश्चित समजून प्रचार सुरू केला होता.भाजप आणि शिंदेंसेना या पक्षांनी दिग्गजांना मैदानात उतरवल्यामुळे प्रत्येक गटात चुरशीची लढत होताना दिसत आहे. मतदारांना भेटून आमच्याकडे लक्ष असू द्या, अशी विनवणी उमेदवार करत आहेत. दिवसभराचा प्रचाराचा क्षीण घालवण्यासाठी जेवणावळी सुरू झाल्या आहेत….
—मोठ्या गावावर लक्ष…
प्रमुख राजकीय पक्षांनी बहुतांशी मोठी लोकसंख्या असलेल्या गावावर लक्ष दिले आहेत. तसेच मोठ्या गावावर विशेष लक्ष केंद्रित केले असून, एकगठ्ठा मतदान मिळवण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागात उमेदवारांचे कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत…
















