छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- येथील आयकर कार्यालयाच्या टीडीएस विभागाने दोन ठिकाणी कारवाई करुन एका रस्ते बांधकाम करणाऱ्या कंपनीकडे तपासणी करुन १ कोटी ७३ लाख रुपयांच्या थकबाकीची वसूली केली. तसेच एका पॉलिमर निर्मिती क्षेत्रातील कंपनीकडे ५० लाख रुपयांची थकबाकी असल्याचे तपासणीअंती निदर्शनास आले, अशी माहिती आयकर अधिकारी राहुल मोरे यांनी दिली आहे.
आयकर कार्यालयाच्या छत्रपती संभाजीनगर व नाशिक येथील पथकाने मंगळवारी (दि.२७) ही कारवाई केली. दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत रस्ते बांधकाम क्षेत्रात काम करणारी कंपनी व ताडपत्री, पॉलिमर, पेपर क्राफ्ट . निर्मिती करणाऱ्या कंपनी अशा दोन ठिकाणि तपासणी करण्यात आली. केंद्रीय सरकारच्या खात्यात कापलेला टीडीएस वेळेवर जमा करण्यात कसूर करणे वा जमा न करणे यासंदर्भात ही तपासणी करुन रस्ते बांधकाम क्षेत्रातील कंपनीकडून १ कोटी ७३ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली. तर पॉलिमर क्षेत्रातील कंपनीने ५० लाख रुपयांची रक्कम जमा केली नसल्याचे दिसून आले. संबंधित कंपन्यांनी आयकर कायदा १९६१ च्या टीडीएस तरतुदींचे पालन करावे,असे आवाहन राहुल मोरे यांनी केले आहे.
















