बारामती :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामती मधील काटेवाडीत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात जनसागर लोटला होता.अजित पवार यांच्या पार्थिवावर येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी पार्थ आणि जय पवार या दोघा पुत्रांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. अजित पवार यांच्या निधनाने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. शोकाकुल वातावरणात बारामतीमधील काटेवाडीच्या विद्या प्रतिष्ठान मैदानात अजितदादांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.अजित पवार यांना अखेरचा निरोप देताना पक्षाच्या नेत्यांना अश्रू अनावर झाले, तर राज्यभरातील कार्यकर्त्यांनी शोकमग्न अवस्थेत त्यांना अंतिम निरोप दिला. अजित दादा परत या…. अमर रहे, अमर रहे, अजित पवार अमर रहे…. असं म्हणत कार्यकर्त्यांनी टाहो फोडला. साश्रू नयनांनी अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनाला अफाट जनसागर लोटला होता. महाराष्ट्रासह देशभरातील अनेक नेते अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमले होते. यावेळी राजकीय नेत्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत कुणालाही अश्रू आवरता येत नव्हते. अत्यंत शोकाकुल वातावरणात अजित पवारांना शेवटचा निरोप दिला.
यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी अजित पवार यांच्या पार्थिवाला प्रथम पुष्पचक्र अर्पण करून अखेरची श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ,रक्षा खडसे,माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आंध्र प्रदेशचे मंत्री नारा लोकेश, माजी खासदार निवेदिता माने, मंत्री गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, राणा जगजितसिंग, उद्योजक नरेश आरोरा, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आदिती तटकरे,अभिनेता रितेश देशमुख, खासदार बजरंग सोनावणे,निलेश लंखे, संजय दिना पाटील, धनंजय मुंडे, नमिता मुंदडा,माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे,जयदिप कवाडे,अमोल मिटकरी,झिशान सिद्दीकी,सुरज चव्हाण यांच्यासह देशभरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, राज्याच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आमदार खासदार या प्रसंगी उपस्थित होते बारामती तालुक्यातील निरावागज, पणदरे, करंजेपूल (सोमेश्वर) आणि सुपा या गावात बुधवारी सकाळी अजितदादांच्या प्रचारसभांचं आयोजन करण्यात आलं होतं.
अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने देशभर खळबळ उडाली. प्रशासनावर पकड असलेला, जनतेच्या प्रश्नांवर सदैव काम करत राहणारा आणि रोखठोक व्यक्तिमत्त्व असलेला नेता गमावल्याची भावना देशभरातून व्यक्त होत आहे.
अजित पवार यांच्या अकाली निधनाच्या धक्क्याने सारेच हादरले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह देशभरातील नेतेमंडळींनी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.अजित पवार यांचं पार्थिव ठेवण्यात आलेल्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यदर्शनासाठी बुधवारी रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी गर्दी केली होती. गुरुवारी अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर पार्थ आणि जय पवार यांनी हात जोडून जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
——-
अजित पवार यांचे अंत्यसंस्कार पूर्ण झाल्यानंतर ते अनंतात विलीन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली. येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणातून बाहेर पडताना शरद पवार यांनी उपस्थित जनसमुदायाला हात जोडून अभिवादन केले. यावेळी सुप्रिया सुळे देखील अत्यंत भावूक झाल्याचे दिसून आले.
अजित पवार यांच्या अंतिम दर्शनासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय लोटला होता. या शोकाकुल वातावरणात संपूर्ण पवार कुटुंबियांनी, विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणातून निघताना, हात जोडून सर्वांना अभिवादन केले. सुप्रिया सुळे यांनीही उपस्थित लोकांना अभिवादन करत या ठिकाणाहून प्रस्थान केले. या दुःखाच्या प्रसंगात लाखो नागरिक पवार कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी झाले, हे यातून स्पष्ट झाले. पवार कुटुंबाने जनतेचे हे प्रेम आणि पाठिंबा स्विकारत सर्वांचे आभार मानले.
—-
अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. बारामतीमधील काटेवाडी येथे विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या प्रांगणात हा अंत्यसंस्काराचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी अजित पवारांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थित नागरिकांनी ‘अजित पवार अमर रहेंगे’च्या घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांच्या घोषणा आणि आक्रोशाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. यावेळी पार्थ पवार आणि जय पवार यांनी हात जोडून नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र भावनिक झालेला जमाव स्वत:ला रोखू शकत नव्हता.















