छत्रपती संभाजीनगर, दि. २९ : मराठी सिनेमा आशयाच्या पातळीवर अधिक प्रामाणिक, वैविध्यपूर्ण आणि सामाजिक जाणिवांनी समृद्ध होत आहे. मात्र, हे आपले मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वितरण व्यवस्था, चित्रपटगृहांची संख्या आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असून भविष्यकाळ आशादायक असल्याचा सूर आज झालेल्या ‘मराठी चित्रपटाचा बदलता चेहरा’ या परिसंवादात मान्यवरांनी काढला.
अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘मराठी चित्रपटांचा बदलता चेहरा’ या विषयावर आयोजित परिसंवादात मराठी सिनेमाच्या आशय, मांडणी, निर्मिती प्रक्रिया आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याच्या आव्हानांवर सखोल चर्चा झाली. या परिसंवादात ‘साबरबोंड’चे दिग्दर्शक रोहन कानवडे, ‘आत्मपॅम्फ्लेट’चे दिग्दर्शक आशिष बेंडे आणि निर्माती तन्मयी देव सहभागी झाले होते. या परिसंवादाच्या संवादिका म्हणून नम्रता फलके यांनी काम पाहिले. यावेळी एमजीएम कॉलेज ऑफ कम्युनिकेशन, कल्चर अँड मीडियाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या एमजीएम इन्सपायर या अंकाचे महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
परिसंवादात बोलताना दिग्दर्शक आशिष बेंडे म्हणाले, माझ्या अनुभवविश्वातील कथा मी लिहिल्या असून बालपणी कंडक्टर, रेल्वेचालक आणि सैन्यात जाण्याची स्वप्ने पाहत मी मोठा झालो. मला माझ्या वडिलांनी चित्रपटांची आवड लावली. शालेय नाटकांतून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे अभिनयाकडे वळलो; मात्र पुढे अभिनयापेक्षा मला दिग्दर्शन अधिक जवळचे वाटल्याने मी दिग्दर्शनाकडे वळलो. कथा सांगताना तटस्थपणे पाहून ती कोणत्या माध्यमात योग्य ठरेल, हे ठरवणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट आपापली शैली घेऊन येत असते. आज प्रेक्षकांपर्यंत सिनेमा पोहोचविण्याची गरज असून मराठवाड्यात मराठी सिनेमा पाहण्याची भूक आहे; मात्र पुरेशी चित्रपटगृहे आहेत का, हा प्रश्न आहे.
दिग्दर्शक रोहन कानवडे यांनी ‘साबरबोंड’ या चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांना समृद्ध करणारा अनुभव असल्याचे सांगितले. “लहानपणापासून सिनेमा करायचे ठरवले नव्हते. चित्रपट पाहताना हळूहळू आवड निर्माण झाली. शालेय अभ्यासक्रमातील ‘स्मशानातील सोनं’ हा धडा वाचून मला लिखाणाची आवड निर्माण झाली. २००७ साली मित्राचा मोबाईल वापरून पहिली शॉर्ट फिल्म बनवली तेथून माझा प्रवास सुरू झाला. मी कोणता संदेश द्यायचा म्हणून चित्रपट बनवत नसून त्यातून काय घ्यायचे हे प्रेक्षक ठरवत असतात. वैयक्तिक आयुष्यातील अनुभव, नातेसंबंध, लैंगिक ओळख याविषयी प्रामाणिकपणे मांडणी केली तर कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचते, हा माझा अनुभव आहे.
निर्माती तन्मयी देव यावेळी बोलताना म्हणाल्या, कोणताही चित्रपट ठरवून तयार होत नाही. सुरुवातीचे काही दिवस कल्पना, कथा आणि दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतात. निर्मात्याकडे केवळ आर्थिक क्षमता नव्हे तर सर्जनशील समजही असणे आवश्यक आहे. दिग्दर्शकाची दृष्टी, कथा आणि क्रिएटिव्हिटीला पाठबळ देणे हे निर्मात्याचे महत्त्वाचे काम असते.
















