छत्रपती संभाजीनगर, दि.३० : असणं आणि नसणं यामधील केवळ एका श्वासाचे अंतर ओळखून त्या श्वासाशी प्रामाणिक राहण्याचे नैतिक बळ महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनातून सिद्ध केले. वैयक्तिक जीवनापासून सार्वजनिक व राजकीय आचरणापर्यंत नैतिकतेचा ठाम आधार घेत वैश्विकतेशी एकरूप झालेला जिवात्मा म्हणजे महात्मा गांधी असून राजकारणात नैतिकता शक्य आहे, हे त्यांनी जगासमोर कृतीतून सिद्ध केले, असे प्रतिपादन प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांनी केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त महात्मा गांधी मिशनच्यावतीने चिंतनगाह येथे आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेमध्ये आज सकाळी मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास सुतमाला अर्पण करून त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. बाविस्कर यांनी ‘महात्मा गांधी : एक शोधयात्री’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. शरद बाविस्कर, एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ.पी.एम.जाधव, सचिव अंकुशराव कदम, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, ज्येष्ठ गांधीवादी श्रीराम जाधव, प्रा. एच.एम. देसरडा, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, सर्व अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख, विद्यार्थी व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. बाविस्कर म्हणाले, सत्ता आणि सत्य, सत्ता आणि निती यांत फारकत करण्यात आली असून यांत फारकत करावीच लागते, असे राजकीय तत्ववेत्यांनी मांडलेले आहे. या सगळ्या राजकीय तत्ववेत्यांना छेद देणारे तत्वज्ञान आपल्या कृतिशील जीवनातून सिद्ध करणारे व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा गांधी होय. महात्मा गांधी यांचे नांव गावोगावी आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. महात्मा गांधी म्हणजे सत्य होय. त्यांचे नांव घेण्याचा अधिकार सर्वांना आहे मात्र, आपल्यात जर दांभिकता असेल तर आपल्याला त्यांचे नांव घेण्याचा अधिकार उरत नाही.
महात्मा गांधींनी मांडलेली सात सामाजिक पापे आजही तितकीच मार्गदर्शक आहेत. त्यातील ‘चरित्राशिवाय ज्ञान’ हे पाप समाजासाठी अत्यंत घातक आहे. ज्ञानाला जर चारित्र्याची जोड नसेल तर ते दिशाहीन ठरते. स्वावलंबन, वेळेचे योग्य व्यवस्थापन आणि वेळेची कार्यक्षमता हे गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील महत्त्वाचे पैलू होते. गांधीजींनी आपल्या संपूर्ण जीवनातून स्वयंपूर्णता आणि स्वावलंबनाचा संदेश दिला. त्यामुळे त्यांचे विचार केवळ सांगण्यापुरते न ठेवता, आपण ते आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष आचरणात आणले पाहिजेत, असे यावेळी बोलताना कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकाळ यांनी सांगितले.
गायक राहुल खरे आणि संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्रार्थना आणि भजने सादर केली. यावेळी विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी सामूहिक सुतकताई केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजू सोनवणे तर आभार प्रदर्शन अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके यांनी केले. महात्मा गांधी यांच्या स्मृतींना यावेळी २ मिनिटे मौन पाळून अभिवादन करण्यात आले.
















