छत्रपती संभाजीनगर, दि. ३० : माझे बहुआयामी व्यक्तिमत्त्व दिग्दर्शकांनी ओळखून त्यांनी मला दरवेळी वेगवेगळ्या भूमिका दिल्या. झपाटलेला चित्रपटातील ‘तात्या विंचू’, ‘लगे रहो मुन्नाभाई’मधील महात्मा गांधी, ‘दशावतार’मधील बाबुली मेस्त्री अशा अविस्मरणीय भूमिका मी या दिग्दर्शकांमुळे करू शकलो. त्यांनी माझ्यातला नट शोधत मला भूमिका साकारण्यास मदत केली. विशेषत: मी कोणताही अभिनय करत नसतो त्यावेळी मी स्वतः चाच अभिनय करत असतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी यावेळी केले.
अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ, अष्टपैलू अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी घेतलेली प्रकट मुलाखत रसिकांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाली. या संवादातून प्रभावळकर यांनी आपल्या आयुष्यातील प्रवास, संघर्ष, निर्णयप्रक्रिया, अभिनयाविषयीची भूमिका आणि लेखनाची वाटचाल अत्यंत प्रामाणिकपणे उलगडली.
पुढे बोलताना अभिनेते प्रभावळकर म्हणाले, शाळा आणि महाविद्यालय इतकाच माझा परीघ होता. रुईया महाविद्यालयाच्या ‘जनावर’ या एकांकिकेसाठी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत पारितोषिक मिळाल्यानंतर अभिनयाविषयीचा आत्मविश्वास वाढला. याच काळात लिखाणाचा आत्मविश्वासही निर्माण झाला आणि स्वतःला शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली. मला मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये दाखल होऊन संशोधक व्हायचे होते. मात्र, तिथे मी जाऊ शकलो नाही. त्यानंतर मी फार्मास्युटिकल कंपनीत नोकरी केली; मात्र अभिनयाची ओढ मला कायम होती. कोणतीही सवलत न घेता नोकरी करत असतानाच मी माझा अभिनयाचा प्रवास करीत होतो. वयाच्या चाळिशीनंतर मी पूर्णवेळ अभिनेता होण्याचा निर्णय घेतला.
वृद्ध व्यक्तिरेखा तरुण वयापासून साकारत आलो, असे सांगत अभिनेते प्रभावळकर यांनी दिग्दर्शकांच्या विश्वासाचे महत्त्व अधोरेखित केले. ‘लगे रहो मुन्नाभाई’मध्ये गांधीजींची भूमिका करताना प्रचंड दडपण होते. “मी गांधीजींवरील पुस्तके वाचली, भाषणे ऐकली, तयारी केली. लोक मला गांधी म्हणून स्वीकारतील का, अशी भीती होती; मात्र चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला. या चित्रपटाचे खरे नायक हे दिग्दर्शक राजू हिरानी आहेत. या एका चित्रपटाने त्या काळात देशभर ‘गांधीगिरी’ची लाट आली होती.
रंगमंच, चित्रपट आणि माध्यमांच्या भिन्नतेविषयी बोलताना अभिनेते प्रभावळकर म्हणाले, नाटकात प्रमाणबद्धता आवश्यक असते. सिनेमात मी दिग्दर्शकाला शरण जातो; सिनेमा हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे. महाविद्यालयीन काळातील अनुभवांनी लिखाणाची दिशा मिळाली. प्रकाशक आणि संपादकांनी मला लिहायला प्रवृत्त केले. ‘गुगली’ हे माझे पहिले पुस्तक असून आजवर मी ३१ पुस्तके लिहिली आहेत.
















