छत्रपती संभाजीनगर :- विभागामार्फत आयोजित दोन दिवसीय जिल्हास्तरीय दुर्मिळ टपाल तिकीट प्रदर्शन (CSNPEX-2026) चा शुभारंभ उद्या दि. ३० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता कैलास शिल्प, सांस्कृतिक सभागृह, टी.बी. सेंटर, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन श्री अमिताभ सिंह, चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र व गोवा सर्कल यांच्या शुभहस्ते होणार आहे.
यावेळी डॉ. अजिंक्य काळे, निर्देशक डाक सेवा, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी मा. श्री जी. हरिप्रसाद, प्रवर डाक अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर विभाग यांनी स्वतः स्थळी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला आहे.
या प्रदर्शनामध्ये १८५४ सालापासून ते आजपर्यंत भारत व जगभरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक व वारसाचे दर्शन घडविणारी दुर्मिळ टपाल तिकिटे पाहण्यासाठी व विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. यामध्ये स्वातंत्र्यसैनिक, भारतीय संस्कृती, निसर्ग, प्राणीजीवन, कला, शिल्प, साहित्य व ऐतिहासिक वारसा दर्शविणाऱ्या टपाल तिकिटांचा समावेश आहे.
प्रदर्शनात फिलाटेली तिकीट स्टॉल्स, My Stamp स्टॉल्स तसेच महाराष्ट्रातील नामवंत फिलाटेली संग्राहकांचे दुर्मिळ संग्रह जनतेसाठी खुले राहणार आहेत. My Stamp सुविधेमुळे नागरिकांना स्वतःचा फोटो टपाल तिकिटावर छापून घेण्याची अनोखी संधी मिळणार आहे.
या प्रदर्शनासाठी जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला असून विद्यार्थ्यांसाठी विशेष स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना प्रदर्शनस्थळी ये-जा करण्यासाठी आयोजकांकडून आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर व जिल्ह्यातील नागरिकांनी या दुर्मिळ टपाल तिकीट प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मा. श्री सुरेश एल. बन्सोडे, प्रवर डाकपाल (राजपत्रित), औरंगाबाद हेड पोस्ट ऑफिस, मा. मासूम पटेल, उप डाक अधीक्षक, मा. श्री मामिडवार, सहाय्यक डाक अधीक्षक व मा. श्री निवृत्ती तोडकर, निरीक्षक डाकघर यांनी केले आहे.
















