नांदेड : यादव अहिर गवळी समाजाच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य आंतरराज्यीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा दिनांक २ व ३ फेब्रुवारी २०२६ रोजी भांडीरवन, द्वारिकाधाम, नरहर कुरुंदकर हायस्कूल मैदान, कौठा, नांदेड येथे संपन्न होणार असून, यामध्ये ३१ जोडपी विवाहबंधनात बांधली जाणार आहेत.
या सामूहिक विवाह सोहळ्यास महाराष्ट्र, तेलंगणा व मध्यप्रदेशातील ४२ गावांमध्ये विखुरलेला यादव अहिर गवळी समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, हजारो समाजबांधव नांदेडमध्ये दाखल होणार असल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख डॉ कैलाश भानुदास यादव यांनी दिली.
या सोहळ्याच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून महामाई माता मंदिर, देवी नगर, नांदेड येथे वधू-वरांच्या निमंत्रण पत्रिकेचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण अहिरातीत असलेल्या ४२ गावांमध्ये निमंत्रण पत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. यादव अहिर गवळी समाज गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने सामूहिक विवाहाचा उपक्रम राबवत असून, सन १९९९ पासून आतापर्यंत सुमारे ८३० जोडपी या सामूहिक विवाह योजनेअंतर्गत विवाहबद्ध झाली आहेत. कोणतीही राजकीय अथवा वैयक्तिक देणगी स्वीकारली जात नसून, केवळ वर-वधूकडून मिळणाऱ्या नाममात्र देणगीतून आणि अत्यल्प खर्चात, सर्व धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक परंपरांचे पालन करून हा विवाह सोहळा पार पाडला जातो. या सामूहिक विवाह उपक्रमामुळे समाजात साधेपणा, आर्थिक बचत, समता व सामाजिक एकोप्याचा संदेश दिला जात आहे. हुंडा प्रथा व अनावश्यक खर्चाला ठाम नकार देत, विवाह हा संस्कार म्हणून जपला जातो, हीच या उपक्रमाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. या भव्य आयोजनासाठी नांदेड महानगरपालिकेचे विशेष सहकार्य लाभत असून, स्वच्छता, पाणीपुरवठा व इतर नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने विशेष पोलीस बंदोबस्त व वाहतूक व्यवस्थापन करण्यात येणार आहे.
विवाह विधी व मुख्य कार्यक्रमासाठी नरहर कुरुंदकर हायस्कूल, कौठा यांनी भव्य मैदान उपलब्ध करून दिले असून, कौठा येथील डेरा शहीद बाबा दीपसिंग जी यात्रानिवास यांचे वधू-वर तसेच समाजबांधवांच्या निवासासाठी बहुमूल्य योगदान लाभत आहे. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला यादव अहिर गवळी समाजाचा हा सामूहिक विवाह सोहळा समाजहित, संघटनशक्ती आणि सामाजिक बांधिलकीचे प्रभावी दर्शन घडवणारा ठरणार असून, या सोहळ्यास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
















