छत्रपती संभाजीनगर, दि.३१: जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप समारंभ रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता प्रोझोन मॉल येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक व निर्माते आनंद एल. राय यांची समारोप सोहळ्यास प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या समारोप सोहळ्यास ऑस्कर विजेता साऊंड डिझाईनर रसूल पूकुट्टी, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, महोत्सव संचालक सुनील सुकथनकर, महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, दिग्दर्शक जयप्रद देसाई, दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, डॉ.शिव कदम व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित असणार आहेत.
रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी पहिल्या सत्रात सकाळी १०.०५ वा मॅगझीन हा मराठी भाषेतील भारतीय चित्रपट दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १२.०५ वा. टोयाज हा २४ मिनीटांचा हिंदी भाषेतील भारतीय चित्रपट दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच टू व्हायसेस इनटू अॅ्न इको कोरीयन भाषेतील कोरीया देशाचा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. दुपारी २.३५ वा. बाय अनादर नेम कोरीयन भाषेतील कोरीया देशाचा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सायं. ४:१५ वा. सिनेमा जॅझरेह हा रोमानिया, तुर्की, बल्गेरिया या देशांचा सहनिर्मिती असलेला दारी, अफगाण पर्शियन भाषेतील भारतीय चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ०३:३० वा. आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे हिंदी सिनेमांमधील प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या मास्टरक्लासचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक जयप्रद देसाई हे त्यांच्या समवेत संवाद साधणार आहेत. सुवर्ण कैलास पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समारोपाची फिल्म म्हणून यंदाच्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीतील महत्वपूर्ण फिल्म ‘इट वॉज जस्ट अॅन अक्सिडेंट’ (फारसी, अझरबैजानी) दाखविण्यात येणार आहे.
















