मुंबई : राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. पण, शपथविधी सोहळ्यावरून पवार कुटुंबांमध्ये दोन गट पडल्याचे पाहण्यास मिळाले. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सगळेच नेते शपथविधी सोहळ्याला हजर होते. तर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे बारामतीतच हजर होते. शपथविधी सोहळ्याला कुणीही आले नाही. सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर रोहित पवार यांनी सुचक असं ट्वीट केलं.
मुंबईमध्ये एकीकडे शपथविधी सोहळा सुरू होता त्यावेळी रोहित पवार हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव यांच्या तरडगाव येथील निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली. मुंबईत सुनेत्रा पवार यांचं शपथविधी सोहळा संपन्न झाल्यानंतर रोहित पवार यांनी ट्वीट केलं.
राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मा. सुनेत्राकाकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे. खरं म्हणजे मा. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही पण किमान सुनेत्राकाकींच्या रुपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू..! डोक्यावर डोंगराएवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकूल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात, हे कळत नाही..! असे आमदार रोहित पवार यांनी आपल्या x वर म्हटले आहे.
















