छत्रपती संभाजीनगर, दि. १ : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप समारंभ मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रोझोन मॉल येथे संपन्न झाला. यावेळी भारतीय चित्रपट स्पर्धेतील मानाचे सुवर्ण कैलास पारितोषिक परज्या या चित्रपटास प्रदान करण्यात आले.
यावेळी, सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक व निर्माते आनंद एल. राय, ऑस्कर विजेता साऊंड डिझाईनर पद्मश्री रसूल पूकुट्टी, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, महोत्सव संचालक सुनील सुकथनकर, महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, दिग्दर्शक जयप्रद देसाई, दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, फ्रिप्रेसी इंडिया ज्यूरी चेअरपर्सन सी.एस.व्यंकटेश्वरन, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, प्रोझोनचे केंद्र संचालक कमल सोनी, डॉ. शिव कदम व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना दिग्दर्शक आनंद एल. राय म्हणाले, आपल्या मनाला आवडते तेच करत जगणे म्हणजे खरे जगणे आहे. आपल्या प्रवासात यश आणि अपयश येत राहते मात्र, आपण त्या दोन्हींही भूमिकातून जात असताना शिकत राहणे आवश्यक असते. अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मी वारंवार येत राहीन; विशेषत: या महोत्सवातून जात असताना मी साऱ्या गोष्टी शिकून जात आहे.
एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम म्हणाले, अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव वर्षानुवर्षे वाढत असून हा आपला महोत्सव आता राष्ट्रीय पातळीवर चर्चिला जात आहे. यंदाच्या वर्षी अगदी कलकत्ता, दिल्ली, हैदराबाद, केरळ आणि चेन्नई अशा देशभरातील विविध भागातून रसिक प्रेक्षक या महोत्सवात सहभागी झाले आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून केवळ मनोरंजन न साधता शैक्षणिक, सामाजिक आणि एकंदरीतच आपली जीवणाबद्दलची समज वाढविण्यास मदत होत आहे.
यावेळी बोलताना संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल म्हणाले, या महोत्सवात मोठ्या प्रमाणात दिग्दर्शक सहभागी झाले आहेत. या महोत्सवात संपूर्ण जगभरातील चित्रपट दाखविण्यात आले. माणसाच्या हृदयाला स्पर्श करण्याची क्षमता चित्रपटात असते. या महोत्सवात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी सहभागी झाली होती. सुवर्ण शालीवाहन हा पुरस्कार मराठी चित्रपटासाठी पुढच्या वर्षी पासून दिला जाणार आहे.
पुढे बोलताना ऑस्कर विजेता साऊंड डिझाईनर पद्मश्री रसूल पूकुट्टी म्हणाले, मराठवाड्यासारख्या भागामध्ये हा चित्रपट महोत्सव होत आहे, ही निश्चितपणे कौतुकास्पद बाब आहे. हा ,महोत्सव इतका यशस्वी होण्यामध्ये येथील प्रेक्षकांची महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. विषेशकरून येथील प्रेक्षक चित्रपटांवर प्रचंड प्रेम करणारे आहेत. मी या महोत्सवात डर वर्षी सहभागी होणार आहे.
या महोत्सवात चित्रपटप्रेमी रसिकांचा खूप मोठ्या प्रमाणावर सहभाग यावर्षी होता. या महोत्सवात खूप लोकांना भेटलो. चित्रपट सृष्टीत काम करणारे अनेक मान्यवर या महोत्सवात सामान्य प्रेक्षक म्हणून सहभागी झाले होते. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानतो, असे महोत्सव संचालक सुनील सुकथनकर यावेळी म्हणाले.
महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, आजच्या या समारोप समारंभात समाधानाची भावना आहेत. हा महोत्सव सहा दिग्दर्शक म्हणून काम करीत आहेत. विशेषतः हे सगळे दिग्दर्शक आयोजक म्हणून काम करीत आहोत. दिवसेंदिवस या महोत्सवाचा परीघ वाढत आहे. देशभरातून प्रेक्षक या महोत्सवात सहभागी झाले होते. या महोत्सवाचे नाव आज देशभर पोहचले आहे.
एमजीएम वृत्तपत्र व जनसंवाद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांद्वारे तयार करण्यात आलेल्या ‘एमजीएम इंस्पायर’चे या न्यूजलेटरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शिव कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन संयोजक नीलेश राऊत यांनी मानले.
















