छत्रपती संभाजीनगर : क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे नांदेड येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय शालेय नेटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने विजेतेपद पटकावले. छत्रपती संभाजीनगरच्या जिज्ञासा चौहान हिने 17 वर्षांखालील मुलींच्या गटात तर विरोचन शिंदे याने 14 वर्षांखालील मुलांच्या गटात उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत विजयात मोलाचा वाटा उचलला.
27 ते 31 जानेवारीदरम्यान नांदेड येथे गुरू गोविंदसिंग क्रीडांगणावर 14 वर्षांखालील मुले व मुली तसेच 17 वर्षांखालील मुलींच्या राष्ट्रीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धा पार पडल्या. तिन्ही गटांत महाराष्ट्राने विजेतेपद पटकावले. हा विजय दिवंगत उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांना समर्पित करण्यात आला. महाराष्ट्र ॲमेच्युअर नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सतीश इंगळे, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, स्पर्धा निरीक्षक प्रीती सोपनीस, पंचप्रमुख लक्ष्मण दातीर, जिल्हा सचिव प्रवीण कुपटीकर यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना सुवर्णपदक, प्रमाणपत्र आणि विजेतेपदाचा करंडक देण्यात आला.
मुलांच्या गटात उत्कृष्ट कामगिरी करणारा विरोचन शिंदे हा पद्मश्री शंकरबापू आपेगावकर शाळेचा विद्यार्थी आहे. पीएसबीए शाळेच्या प्रशासक समृद्धी भोसेकर, महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, उपमुख्य संबंध अधिकारी विश्वास पाटील, नेटबॉल असोशिएशनचे हर्ष मगरे, आकाश सरदार, शिक्षक अभिजित देशमुख, गजानन दीक्षित यांनी त्याचे अभिनंदन केले. विरोचन हा महावितरणच्या 33 केव्ही शेंद्रा एमआयडीसी उपकेंद्रातील यंत्रचालक तथा राज्य शासनाचा ‘गुणवंत कामगार पुरस्कार’प्राप्त कर्मचारी रमेश काकासाहेब शिंदे यांचा सुपुत्र आहे.
कॅप्शन : राष्ट्रीय शालेय नेटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या मुलींच्या संघाची जिज्ञासा चौहान व मुलांच्या संघाचा विरोचन शिंदे यांना करंडक देताना महाराष्ट्र ॲमेच्युअर नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सतीश इंगळे, हर्ष मगरे, आकाश सरदार आदी.
















