छत्रपती संभाजीनगर, दि. ५ (प्रतिनिधी) – कर्करोग हा उपचाराने पूर्णपणे बरा होणार आजार आहे. प्रत्येकाला आजाराला धैर्याने सामोरे गेल्यास त्याला पराभूत करता येते. मात्र, अफवा आणि उपचार टाळणे हे जीवघेणे ठरते. त्यामुळे योग्य आहार, पुरेशी झोप घेणे, जीवनशैली चांगली ठेवणे. व्यसनांना दूर ठेवून कर्करोगावर विजय मिळवण्याचे आवाहन प्रसिद्ध कर्करोग सर्जन, कृपामयी हॉस्पिटलचे संचालक डॉ. विराज बोरगावकर यांनी केले.
जागतिक कर्करोग दिनानिमित्त त्यांनी रुग्णांना मार्गदर्शन करतांना कर्करोगाबाबतच्या शंका, समस्या आणि प्रश्नांचे उकल केली. यावेळी ते म्हणाले की, कॅन्सरचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने देशात सध्या हे सर्वात मोठे संकट बनत चालले आहे. देशभरात दरवर्षी जवळपास १५ लाख नवीन रुग्ण आढळत आहेत, परंतु २०४५ पर्यंत ही संख्या १५ लाखांऐवजी २४.५ लाख होण्याची भीती आहे. त्यामुळे देशात केंद्र सरकारने कर्करोगावरील औषधांवर सुट देऊन रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले आहे. मात्र, आजारापेक्षा प्रथमोपचार बरा, असे आपण म्हणतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या शरिराची काळजी घेणे गरजेचे आहे. यावेळी बीड येथील जिल्हा रुग्णालय मध्ये जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात आला. या वर्षीचे ब्रीदवाक्य ‘कॅन्सर युनाइटेड बाय युनिक ‘ हे ठेवण्यात आले आहे, या कार्यक्रमासाठा डॉ. विराज बोरगावकर प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते. ते म्हणाले की, कृपामयी हॉस्पिटल येथील डॉक्टरांची टीम ही बीड मध्ये दर महिन्याच्या पहिल्या व तिसर्या शनिवारी उपलब्ध असते. आपल्या जवळच्या नातेवाईकांना, मुंबई, पूर्ण आणि मेट्रो शहरात जाणे परवडत नाही. त्यांनी स्थानिक ठिकाणी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शासनाने अनेक आजारावर योजनेच्या माध्यमातून सोईसुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यासाठी आमची टीम नेहमीच सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी बीड जिल्हा रुग्णालयमधील डॉ. सतीशकुमार सोळंके, डॉ. उल्हास गंडाळ, डॉ. संजय राऊत यांनी या कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, रुग्ण आणि हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.
















