छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
कॅन्सर डेच्या निमित्ताने कॅन्सरग्रस्त रुग्णांना मानसिक आधार देण्याबरोबरच पोषणाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने व्हॉईस ऑफ मीडिया यांच्या वतीने कॅन्सर हॉस्पिटल, आमखास मैदान येथे फळ वाटपाचा सामाजिक उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. आज दुपारी पाच वाजता संपन्न झालेल्या या उपक्रमात रुग्णांना ताजी व पौष्टिक फळे वाटप करण्यात आली.
कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर उपचार घेत असताना संतुलित आहार, सकारात्मक वातावरण व सामाजिक पाठबळ अत्यंत महत्त्वाचे असते. याच भावनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम रुग्णांसाठी दिलासादायक ठरला. या माध्यमातून कॅन्सरविषयी जनजागृती करणे, रुग्णांना “तुम्ही एकटे नाही” हा विश्वास देणे आणि समाजाने मानवी संवेदनशीलतेने पुढे येणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष (सा.वी) अब्दुल कय्यूम म्हणाले,
“कॅन्सरसारख्या आजाराशी लढणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय उपचारांसोबत मानसिक आधार, आपुलकी आणि सकारात्मक ऊर्जा तितकीच आवश्यक असते. फळ वाटपाचा हा उपक्रम म्हणजे रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा आणि त्यांना ‘तुम्ही एकटे नाही’ हा विश्वास देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. समाजातील प्रत्येक घटकाने अशा उपक्रमांत सहभागी व्हावे. भविष्यातही व्हॉईस ऑफ मीडिया सामाजिक बांधिलकी जपत असे उपक्रम सातत्याने राबवेल.”
जिल्हाध्यक्ष डॉ. शेख शकील यांनी सांगितले की, कॅन्सरला घाबरून न जाता वेळेवर तपासणी व उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो. जनजागृती आणि सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे.
तर ज्येष्ठ समाजसेवक साजीद मौलाना यांनी सांगितले की, व्हॉईस ऑफ मीडियाचा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असून, उपचार घेत असलेल्या सर्व कॅन्सर रुग्णांनी लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना त्यांनी अल्लाहकडे केली. तसेच हॉस्पिटलचे डीन डॉ. गायकवाड व येथील संपूर्ण स्टाफ रुग्णांना चांगल्या पद्धतीने सेवा देत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि सर्व रुग्णांना उत्तम उपचार मिळून ते पूर्णपणे बरे व्हावेत, अशी मनोकामना व्यक्त केली.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक साजीद मौलाना, व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल कय्यूम, जिल्हाध्यक्ष डॉ. शकील शेख, इसाक शेख, अनिस रामपुरे, रमेश जाबा, संजय हिंगोलीकर, गणेश पवार आदींसह व्हॉईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मानवतेची जाणीव जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे कॅन्सर रुग्णांच्या चेहऱ्यावर आशेचे हास्य उमटले.
















