शहापूर/ बी.डी.गायकवाड :- ठाणे जिल्हयातील शहापूर तालुक्यातील ऐतिहासिक असलेल्या माहुली गडाच्या पायथ्याशी असलेल्या तानसा वन्यजीव विभागाच्या माहुली निसर्ग पर्यटन केंद्राची प्रचंड अशी दुरवस्था झाली आहे.येथे ठेवण्यात आलेल्या राष्ट्रीय पक्षी मोर,बिबट्या,हरीण,भेकर,या प्राण्यांच्या प्रतिकृतींची तुटफूट होऊन पुर्णपणे पडझड झालेली आहे.प्रतिकृतींचा
रंग उडाला आहे.त्यांस तडे गेलेले दिसत आहेत.यातील मोराची चोच,तर हरणाची शिंग तुटलेल्या अवस्थेत दिसत आहेत.वन्यप्राणी पक्ष्यांच्या प्रतिकृतींची (स्टॅच्यूची) ही अशी भयाण दैन्यवस्था झाल्याने या प्रतिकृती आता विद्रुप अवस्थेत दिसत असल्याने वन्यप्राण्यांच्या या प्रतिकृतींची ही विटंबना होताना येथे दिसत आहे.या संतापजनक प्रकारामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांत व वन्यप्राणी प्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
माहुली गड व परिसरातील जंगल हे तानसाअभयारण्यातील संरक्षित वनक्षेत्र आहे.गडाच्या पायथ्याशी शहापूर तालुक्यातील पर्यटनाला चालना मिळावी म्हणून
तानसा वन्यजीव विभागाचे माहुली निसर्ग पर्यटन केंद्र येथे उभारण्यात आले आहे.मात्र वन्यजीव विभागाच्या अक्षम्य बेपर्वाईमुळे निसर्ग पर्यटन केंद्राची दुरवस्था झालेली पाहण्यास मिळत आहे.येथील निसर्ग पर्यटन केंद्राची व वन्यप्राण्यांच्या प्रतिकृतींची डागडुजी व देखभाल दुरुस्तीची कामे वन्यजीव विभागाकडून वेळेवर करण्यात न आल्याने वन्य प्राण्यांच्या प्रतिकृतींची देखभाली अभावी दुर्दशा झाल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे.येथील पक्ष्यांचे चित्र असलेले फलक हे देखील पुर्णपणे गंजलेल्या स्थितीत असून मोडकळीस आले आहेत.त्यांचे रंग उडाल्याने हे फलक व त्यावरील पक्ष्यांची चित्र अस्पष्ट दिसत आहेत.येथे बांधण्यात आलेली निवासस्थानं,प्रसाधन,गृह,यांची दैन्यावस्था पाहण्यास मिळत आहे.मोठया प्रमाणात अडगळ व भंगार साहित्य येथे ठेवण्यात आले आहे.लहान मुलांच्या खेळाच्या साहित्य जवळच दगडगोटे,व मातीचे,ढिगारे दिसत आहेत.निसर्ग पर्यटन केंद्राला
गवत,पालापाचोळा,झाडाझुडपांनी अक्षरशः वेढा घातला आहे.वन्यजीव प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे माहुली निसर्ग पर्यटन केंद्राची ही दैन्यावस्था झालेली आहे.येथील वन्य प्राण्यांच्या प्रतिकृतींची ही झालेली पडझड,व विटंबना पाहून येथे येणारे पर्यटक,निसर्गप्रेमी,वन्यजीव अभ्यासक, यांच्यात प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.वेळीच निसर्ग पर्यटन केंद्राकडे वन्यजीव विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे पर्यटकांचे म्हणणे आहे.
प्रतिक्रिया –
माहुली निसर्ग पर्यटन केंद्राच्या देखभाल दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने देखभाल व दुरुस्तीची कामे आम्हाला करता येत नाहीत.
















