नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड येथे १५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या आठव्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आदिवासी संघटनेचे युवा नेते प्रवीण नरसिंग जेठेवाड यांची निवड करण्यात आली.
प्रवीण जेठेवाड हे मन्नेरवारलु आदिवासी संघटनेचे युवा नेते असून कुशल संघटक व उद्योजक आहेत. इट्स माय राईट्स फाऊंडेशनची त्यांनी नुकतीच स्थापना केली असून मानवाच्या मुलभूत हक्कांसाठी ते सतत लढत असतात.
अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीच्या बैठकीत युवा नेते प्रवीण जेठेवाड यांच्या स्वागताध्यक्ष निवडीची घोषणा अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केली.
शिवपार्वती मंगल कार्यालय भावसार चौक मालेगाव रोड नांदेड येथे रविवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित या एक दिवसीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. निर्मला पुंडलिक भामोदे यांची निवड अगोदरच करण्यात आली आहे.
संमेलनाचे उदघाटन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते होणार असून गुरुद्वारा नगीना घाटचे प्रमुख बाबा बलविंदरसिंग यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या साहित्य संमेलनात त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
बहुजन समाज पक्षाचे मराठवाडा झोन प्रभारी मनिषभाऊ कावळे यांची या साहित्य संमेलनाच्या आयोजन समिती मुख्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याने संमेलनाच्या कामाला गती आली आहे.
















