शहापूर :— ज्येष्ठ संपादक कै. विद्याधर गोखले यांचे अमेरिकेत स्थायिक असलेले चिरंजीव संजय गोखले आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा गोखले यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघाला भेट देऊन रुपये एक लाखांची देणगी दिली. यावेळी उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर आणि अंतर्गत हिशेब तपासनीस हेमंत सामंतही उपस्थित होते.
कै. विद्याधर गोखले यांच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे ललित लेखनासाठी दहा हजार रुपये व स्मृतिचिन्ह असा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी या ठेवीचा वापर करावा, अशी सूचना त्यांनी केली.
नाटक हा विद्याधर गोखले यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. यंदा मुंबई मराठी पत्रकार संघाने ६४ व्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होऊन ‘निष्पाप’ हे नाटकही सादर केले होते. तसेच, महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी होणार्या ‘नाट्यशुक्रवार’ या प्रायोगिक रंगभूमीवरील उपक्रमाबाबत त्यांनी कौतुकाने विचारणा केली.
संजय आणि प्रतिभा गोखले यांनी दिलेली रुपये एक लाखांची देणगी ही केवळ आर्थिक मदत नसून, मराठी पत्रकारिता, साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीप्रती असलेल्या त्यांच्या कृतज्ञतेचे व बांधिलकीचे द्योतक आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने मन:पूर्वक आभार मानण्यात आले.
















