सोयगाव, दि. ७ (प्रतिनिधी) : सोयगाव तालुक्यातील आमखेडा जिल्हा परिषद गटातील बहुजन समाज पक्षाच्या दिव्यांग महिला उमेदवार उर्मिला संदीप इंगळे या मतदानासाठी गेल्या सताना मतदान केंद्रावर व्हीलचेअरची व्यवस्था नसल्याने त्या कुबड्यांच्या आधाराने जाताना पडून जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकारामुळे निवडणूक विभागाच्या नियोजनावर नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आमखेडा जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मतदान केंद्र क्रमांक ०२ येथे सकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. उर्मिला इंगळे या मतदानासाठी केंद्रावर गेल्या असता दिव्यांगांसाठी कोणतीही सोय नसल्याचे निदर्शनास आले. त्या कुबड्यांच्या सहाय्याने केंद्राकडे जात असताना कुबडी सरकल्याने त्या खाली पडून जखमी झाल्या.
घटनेनंतर त्यांना तात्काळ सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनाजी खंदारे यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला. या घटनेमुळे इंगळे यांना इतर मतदान केंद्रांना भेट देणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले.
या प्रकारामुळे निवडणूक विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
प्रतिक्रिया
“मी दिव्यांग महिला असूनही प्रस्थापितांच्या विरोधात आमखेडा जिल्हा परिषद गटात निवडणूक लढवत आहे. इतर मतदान केंद्रांना भेट द्यायची असल्याने मी लवकर मतदान करण्यासाठी केंद्रावर गेले. मात्र दिव्यांगांसाठी कोणतीही सुविधा नव्हती. त्यामुळे मला हा प्रसंग ओढावला. या घटनेबाबत पोलिसांत तक्रार देणार आहे.”
















