सोयगाव, दि.८ (प्रतिनिधी) : देशाच्या सीमारेषेवर २४ वर्षे निःस्वार्थ सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले शेंदुर्णी येथील जवान गणेश रामदास बोडखे यांचे गावात आगमन होताच भावनिक वातावरण निर्माण झाले. त्यांच्या सन्मानार्थ ग्रामस्थांनी भव्य मिरवणूक काढत सत्कार केला.
सेवाकाळात जवान बोडखे यांनी कडाक्याची थंडी, प्रखर उन्हाळा आणि सततच्या धोक्याच्या परिस्थितीत देशरक्षणाची जबाबदारी पार पाडली. सण-उत्सव आणि कौटुंबिक सुख-दुःख यांपासून दूर राहून त्यांनी “देश प्रथम” या भावनेने सेवा दिली.
त्यांच्या सन्मानार्थ गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून संविधानिक मूल्यांचा सन्मान व्यक्त करण्यात आला. पुढे हनुमान मंदिरात पूजन करून मिरवणूक जवान बोडखे यांच्या निवासस्थानी पोहोचली.
तेथे आयोजित सत्कार समारंभात शेंदुर्णी नगरपंचायतीचे नगरसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांनी जवान बोडखे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
यावेळी वक्त्यांनी, “सीमेवर उभा असलेला जवान म्हणजे देशाची जिवंत ढाल आहे. त्यांच्या त्यागामुळेच नागरिक सुरक्षित आहेत,” असे गौरवोद्गार काढले. जवान बोडखे यांच्या आई-वडिलांच्या संस्कारांचेही कौतुक करण्यात आले.
२४ वर्षांच्या सेवेनंतर गावात परतलेल्या जवानाचा सत्कार पाहून ग्रामस्थांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू तरळले. या प्रसंगी नातेवाईक, युवक, मित्रमंडळ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.















