सिल्लोड( प्रतिनिधी)येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि सामाजिक एकोपा राखत साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. आंबेडकर नगर महिला मंडळ व डॉ. आंबेडकर नगर मित्र मंडळ, सिल्लोड यांच्या वतीने करण्यात आले होते.
सकाळी कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यानंतर परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत खीरदानाचा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमाला महिला, युवक व लहान मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सायंकाळी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत लेझीम पथकाचा सहभाग विशेष आकर्षण ठरला. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. घोषणांनी व जल्लोषात निघालेल्या या रॅलीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या जयंती सोहळ्यामुळे त्याग, समर्पण आणि सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या माता रमाई आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. आंबेडकर नगर महिला मंडळ व डॉ. आंबेडकर नगर मित्र मंडळ, सिल्लोड पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
















