छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी – बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉईज ऑर्गनायझेशन या संघटनेच्या छ.संभाजीनगर विभागाच्या सभासदांचा वार्षिक मेळावा रविवार दि.१ फेब्रुवारी २०२६ रोजी उस्मानपुरा येथील श्रीनिधी सभागृहात उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून कैलासजी चांदीवाल (मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती) यांची उपस्थिती होती तर संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी पुण्याहून सभासदांना मार्गदर्शन करण्यासाठी खास आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दिलीप देशपांडे यांनी गायलेल्या श्रमिक गीताने झाली. त्यानंतर, गेल्या वर्षभरात संघटनेच्या ज्या सभासदांचे निधन झाले त्यांना तसेच नुकतेच विमान अपघातात मृत्यु झालेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आला.
विभागाचे उपाध्यक्ष सुरेश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर विभागीय सचिव रामराजा कुलकर्णी यांनी गत वर्षभराच्या संघटनेच्या कामकाजाचा अहवाल सादर केला. गेल्या वर्षभरात संघटनेत दाखल झालेल्या नवीन सभासदांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले, तर वयाच्या पंचाहत्तरीत पदार्पण करणा-या तसेच वयाची ८० वर्ष पूर्ण करणा-या सभासदांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. एका सभासदाचे कुटुंबीय – सर्वश्री सुशील आणि मंदार संवत्सर या शास्त्रद्न्य पितापुत्रांनी मिळवलेल्या २२ व्या पेटंटबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अजून एक सभासद डॉ.जयंत शेवतेकर यांना नृत्य, नाट्य, अभिनय इ. क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना मिळालेल्या विविध शासकीय बहुमाना बद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. एक सभासद – मीना महर्षी- यांचा नातू अर्णव याला त्याने बनवलेल्या पॅरलिसिसग्रस्त रुग्णांना उपयोगी उपकरणांसाठी राष्ट्रपतींचा बाल वीर पुरस्कार मिळाला प्रमुख पाहुणे न्या.चांदीवाल यांनी आपल्या मनोगतात संघटना करीत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल विशेष कौतुक केले आणि यापुढेही हे कार्य चालुच ठेवावे असे मत व्यक्त केले.
सर्वश्री नारायण अचलेरकर-सरचिटणीस, उपाध्यक्ष चंद्रशेखर बारगजे आणि उपसरचिटणीस मधुसूदन निमकर या संघटनेच्या पदाधिका-यांनी सभासद संख्या वाढ, पेन्शन अपडेशन, मेडीक्लेम पॉलिसिज,क्लेम सेटलमेंट इ. विषयी विविध पातळ्यांवर चालू असलेल्या कामाविषयी आणि त्यातील प्रगती विषयी सभासदांना अवगत केले. अध्यक्ष मोहन घळवे यांनी संघटनेच्या एकंदर कार्याचा धावता आढावा घेतला. मनोज को-हाळे यांच्या आभार प्रदर्शनाने मेळाव्याची सांगता झाली.















