नांदेड : नांदेड येथील गोदावरी कॉलेज ऑफ बँकिंगमध्ये विद्यार्थ्यांसाठी “व्यक्तिमत्त्व विकास व मुलाखत तयारी” या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व सखोल मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना धनंजय तांबेकर म्हणाले की, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक पदवी पुरेशी नसून, विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास या बाबींवर विशेष भर दिला पाहिजे. तसेच इंग्रजी भाषेचे ज्ञान व संगणक कौशल्य ही आजच्या काळातील अनिवार्य गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी शांतपणे ऐकून घेण्याची क्षमता वाढवावी, सहनशीलता आणि संयम विकसित करावा, असे सांगत त्यांनी “आपल्या जीवनाचा रिमोट आपल्या हातात असला पाहिजे” हा प्रेरणादायी संदेश दिला. संवाद कौशल्य म्हणजे केवळ बोलणे नव्हे, तर समोरच्या व्यक्तीचे म्हणणे समजून घेणे व योग्य प्रतिसाद देणे हे देखील संवादाचे महत्त्वाचे अंग असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा वेगळा Aura असतो. आपली संगत आणि विचारसरणी व्यक्तिमत्त्व घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक, उत्साही व आनंदी राहून स्वतःचे ग्रूमिंग, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकासावर लक्ष केंद्रित करावे, असे त्यांनी सांगितले. तसेच मुलाखतीसाठी चालू घडामोडींचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमात त्यांनी पारंपरिक बँकिंग आणि डिजिटल बँकिंगमधील बदल, आधुनिक बँकिंग प्रणालीतील तंत्रज्ञानाचा वाढता वापर, ग्राहक सेवा तसेच बँकिंग क्षेत्रातील करिअरच्या नव्या संधी याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून, भविष्यातील करिअरसाठी नवी दिशा मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांनी धनंजय तांबेकर यांचे आभार मानले.
हा कार्यक्रम GENIAC (Godavari Entrepreneurs Incubation & Accelerator Council)यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उदयपाल लिखारी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.नेहा कुर्तडीकर यांनी केले.
यावेळी जेनीयाकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयूर कोकाटे, गोदावरी कॉलेज ऑफ बँकिंगचे प्रा. प्रताप पाटील, प्रशासकीय अधिकारी वैष्णवी प्रसाद पाटील यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















