छत्रपती संभाजीनगर : महावितरण छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील कर्मचाऱ्यांच्या कला व क्रीडा मंडळातर्फे आयोजित क्रीडा महोत्सवात क्रिकेटमध्ये सिल्लोड विभागास विजेतेपद तर जालना-2 विभागास उपविजेतेपद मिळाले.
महावितरणच्या कला व क्रीडा मंडळातर्फे आयोजित क्रीडा महोत्सवात क्रिकेटसह विविध क्रीडा प्रकारांत कर्मचारी खेळाडूंनी सहभाग घेतला. क्रिकेटमध्ये विविध कार्यालयांच्या 12 संघांत सामने झाले. सिल्लोड विभाग व जालना-2 विभागाचे संघ अंतिम फेरीत पोचले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर रविवारी (8 फेब्रुवारी) झालेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून जालना-2 विभागाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. निर्धारित 10 षटकांत सिल्लोड विभागाने तीन गडी गमावून 160 धावांचा डोंगर उभारला. सचिन वाघने 23 चेंडूत 7 षटकारांसह 62 तर कर्णधार प्रमोद जाधवने 23 चेंडूत 6 षटकारांसह 57 धावा काढत पहिल्या गड्यासाठी 123 धावांची भागीदारी केली. 161 धावांचे लक्ष्य गाठताना जालना-2 विभाग 4 गडी गमावून केवळ 79 धावा करू शकला. गजानन गोधेने सर्वाधिक 20 धावा काढल्या. अष्टपैलू कामगिरीसाठी प्रमोद जाधवला सामनावीर घोषित करण्यात आले.
मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी विजेत्या व उपविजेत्या संघाचे अभिनंदन केले. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील यांच्या हस्ते दोन्ही संघांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड, सहायक अभियंता सचिन लालसरे, सागर अग्रवाल, शशी सपकाळ, सुनील बनसोड यांच्यासह स्पर्धेच्या संयोजन समितीचे सदस्य, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजेता सिल्लोड विभागाचा संघ : प्रमोद जाधव (कर्णधार), मनोज सोन्ने, सचिन वाघ, विशाल बैरागी, सुनील भांडगरे, राहुल पाटील, मंगेश गरूड, मोरेश्वर शिंपी, विलास दामोदर, शेख सगीर, ऋषिकेश राठोड, अखलाक शेख, कृष्णा जंजाळ, रिझवान पठाण, अरुण पाटील. उपविजेता जालना-2 विभागाचा संघ : योगेश जाधव (कर्णधार), गजानन गोधे, गणेश गाढेकर, महादेव कबले, किशोर शिंदे, संतोष हुसे, मुकेश राठोड, नीलेश चव्हाण, पंढरीनाथ सोळंके, युवराज तारडे, राम सपकाळ, संदीप मगरे, सुशांत गुंडरे, ज्ञानेश्वर नागलोत.














