मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज दुपारी अचानक बिघडली. त्यामुळे यांना तातडीने दुपारीच बारामतीहून पुण्यातील रूबी रूग्णालयात हलविण्यात आले. ८५ वर्षीय शरद पवार हे बारामतीतील त्यांच्या निवासस्थानी असताना त्यांना तीव्र अस्वस्थता जाणवू लागली. त्यांच्या वाढत्या वयाचा विचार करून स्थानिक डॉक्टरांनी त्यांना तातडीने पुण्यातील ‘रुबी हॉल क्लिनिक’मध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात येणार असून, प्रकृती स्थिर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रवासा दरम्यान खासदार सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्यासोबत असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या ताफ्यात सुसज्ज रुग्णवाहिकेचाही समावेश करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या निधनामुळे पवार कुटुंबिय दुःखात असताना, आता शरद पवार यांच्या प्रकृती बाबतच्या वृत्ताने पवार कुटुंबियांना आणि पवार समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात आज जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा निवडणूकांचा निकाल जाहीर करण्यात येत आहे. मात्र शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याचे वृत्त कळताच सर्व राजकिय पक्षांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळपासूनच शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत आहे. रुबी हॉलचे डॉक्टर ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची तपासणी होणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर काय उपचार करायचे ते ठरवलं जाणार आहे. जर गरज वाटली तर त्यांना रुग्णालयात ॲडमिट करून घेतलं जाईल, परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
दरम्यान शरद पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत डॉ. अभिजित लोढा यांनी माहिती दिली आहे.शरद पवार यांच्या छातीमध्ये कफ झालेला आहे, छातीमध्ये थोडसं कजेक्शन आहे. योग्य त्या तपासण्या करण्यात येणार आहेत, आता सध्या शरद पवार यांच्यावर उपचार सुरू आहेत, सध्या शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे. तपासण्यांचा रिपोर्ट आल्यानंतर जर उपचारामध्ये काही बदल करायचा असेल तर तसा बदल करू, त्यांना दोन – तीन दिवसांपासून खोकल्याचा त्रास आहे. असं लोढा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी देखील कार्यकर्त्यांना रुग्णालयात न येण्याचं आवाहन केलं आहे. ‘मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, की आपण हॉस्पिटलला आजिबात येऊ नका, इथे सर्व पेशंट आहेत, आणि आता डॉक्टरांनी जसं सांगितलं शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे. मी स्वत: चर्चा केली आहे, त्यामुळे टेन्शन घेण्याच कारण नाही. गेल्या दहा -बारा दिवसांपासून असलेला ताण, तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की गेल्या दहा -बारा दिवसांपासून पवार साहेब अनेकांना भेटत होते, त्यामुळे थोडासा ताण आला आहे. छातीमध्ये थोडासा कफ झाला आहे, असं रोहित पवार यांनी सांगितले आहे.
















