=====================
आज दिनांक : 10/02/2026 बारावीच्या बोर्ड परीक्षेचा आजचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी भीती आणि तणावाचा असतो. मात्र, येथील पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात आज वेगळेच चित्र पाहायला मिळाले. परीक्षेच्या तणावाखाली असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी आणि खेळीमेळीच्या वातावरणात परीक्षा पार पडावी यासाठी महाविद्यालय प्रशासनाने पुढाकार घेत विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले.
या अनोख्या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमधील परीक्षेची भीती दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .पंडित नलावडे , परीक्षा केंद्र प्रमुख प्रा. वंदना कदम , अंतर्गत भरारी पथक प्रमुख डॉ. दिलीप बिरुटे , महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक डॉ. रिजवान खान आणि IQAC Coordinator डॉ. श्रीकांत जाधव , प्रा. रामहरी सोंडगे ,डॉ तुषार कांबळे,प्रा भिसे यांनी स्वतः प्रवेशद्वारावर उभे राहून विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प दिले.
अचानक मिळालेल्या या आदरातिथ्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमलले आणि त्यांचा आत्मविश्वास दुणावल्याचे दिसून आले. “परीक्षेला घाबरू नका, शांततेने पेपर लिहा,” असा धीरही यावेळी शिक्षकांनी दिला. महाविद्यालयाच्या या सकारात्मक उपक्रमाचे विद्यार्थी आणि पालकांकडून कौतुक होत आहे.
















