मुंबई : आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. अजितदादा यांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. अशी भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंत्रालयात पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारताना व्यक्त केली.
दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते, हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे, हीच माझी प्राथमिकता असेल. दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन. या कठीण प्रसंगी जनतेने दिलेले प्रेम, आधार आणि विश्वास हेच माझे सामर्थ्य आहे. त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एकच वचन देते की, महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करत राहीन. असेही त्यांनी म्हटले आहे.
आज सकाळी सुनेत्रा पवार यांनी प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले त्यानंतर दादर चैत्यभूमी येथे भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.त्यानंतर सुनेत्रा समोरील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात दिवंगत अजित पवार यांच्या आसन आणि प्रतिमेला अभिवादन केले यावेळी त्यांचे चिरंजीव पार्थ सावली सारखे त्यांच्या सोबत होते.
मंत्रालयात आगमन होताच तिथे प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले राजमाता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले या महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन केले.
आज त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला. त्यावेळी मातोश्री सुनेत्रा पवार पित्याच्या जागी आसनस्थ होत कार्यभार स्विकारला त्यावेळी चिरंजीव पार्थ भाऊक झाले होते. तसेच पक्षाचे प्रमुख नेते सुद्धा भावपूर्ण मुद्रेत उपस्थित होते. अजित पवार असताना त्यांच्या समोर उभे राहण्याची ज्यांच्यात हिम्मत नव्हती ते सगळे नेते आज सुनेत्रा पवार यांच्या अवतीभोवती घुटमळत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, आमदार धनंजय मुंडे आदींसह आमदार, नेते मुंबई पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
—00—
















