नाशिक (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या महाकवी वामनदादा कर्डक अध्यासन आणि संवाद पत्रिकेच्या वतीने विद्यापीठातील सर्व अध्ययनार्थींसाठी मराठी ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा, संजीव सोनवणे यांच्या निर्देशानुसार मराठी भाषा पंधरवडा निमित्त आयोजित या स्पर्धेत विद्यार्थ्यांना येत्या दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत भाग घेता येईल.
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक प्रदेश – विभागाची आणि गावांची एक विशिष्ट बोली आहे, जिचा प्रभाव आपणास प्रमाणभाषेत बोलतानाही दिसून येतो. प्रामुख्याने अहिराणी, कोकणी, वऱ्हाडी, मालवणी, झाडीबोली, मराठवाडी, कोल्हापुरी, आग्री, वंजारी, चंदगडी, वाडवळी, खान्देशी आदी बोली भाषांचे जतन करण्याच्या हेतूने ही स्पर्धा आहे. त्यासाठी मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या जिल्ह्यातील किंवा प्रदेशातील बोली भाषेतील कथा, कविता, गाणी, लोकगीते, उखाणे आणि ओव्या इत्यादींचे लेखन पाठवायचे आहे. कथेसाठी ८०० ते १००० शब्दांची मर्यादा असून कविता, गाणी, लोकगीते, लोकनाट्य आणि उखाण्यांसाठी कोणतीही शब्दमर्यादा ठेवण्यात आलेली नाही. स्पर्धकांनी आपले साहित्य स्वतःचे आहे की इतरांचे संग्रहित आहे, याचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. साहित्य टंकलिखित किंवा स्वअक्षरात लिहून त्याची पीडीएफ किंवा वर्ड फाईल सोमवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत paikrao_vk@ycmou.digitaluniversity.ac या ईमेल पत्त्यावर पाठवावी. सोबत स्पर्धक विद्यार्थ्याने आपले पूर्ण नाव, शिक्षणक्रम, अभ्यासकेंद्राचे नाव, केंद्र संकेतांक आणि कायम नोंदणी क्रमांक (पीआरएन) नमूद करणे बंधनकारक आहे.
















