खुलताबाद प्रतिनिधी गिरीस्थान नगर परिषद, खुलताबाद यांच्या वतीने शहरातील युवकांना क्रीडा क्षेत्राकडे प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘गिरीस्थान प्रीमियर लीग २०२६’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष मा. श्री. सय्यद आमेर पटेल बशीर पटेल यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
या उद्घाटन प्रसंगी नगर परिषद खुलताबादचे उपनगराध्यक्ष श्री. नवनाथ बारगळ, मुख्याधिकारी समीर शेख, कार्यालयीन अधीक्षक रुस्तुम फुलारे. नगरसेवक, नगरसेविका , नगरपरिषद कर्मचारी, क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष .. सय्यद अमर पटेल यांनी क्रीडा स्पर्धा या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, संघभावना आणि सकारात्मक जीवनमूल्ये रुजविण्यास उपयुक्त असल्याचे प्रतिपादन केले.
या लीगच्या माध्यमातून केवळ क्रीडा स्पर्धाच नव्हे तर स्वच्छता अभियान, पाणी वसुंधरा अभियान तसेच मोबाईल वापरासंबंधी जनजागृती देखील करण्यात येत आहे. मैदानावर तसेच कार्यक्रमस्थळी स्वच्छतेचे महत्व, पाण्याचा योग्य वापर व संवर्धन, तसेच मोबाईलचा मर्यादित व योग्य वापर याबाबत फलक, घोषणा व संदेशांच्या माध्यमातून नागरिकांना जागरूक करण्यात येत आहे.
नगर परिषद खुलताबादच्या या उपक्रमाचे उपस्थित नागरिक व युवकांनी कौतुक केले. क्रीडा व सामाजिक जनजागृती यांचा संगम साधणारी ही स्पर्धा शहरासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
गिरीस्थान प्रीमियर लीग २०२६ ही स्पर्धा आगामी काही दिवस चालणार असून विविध संघांमध्ये चुरशीच्या व खेळाडूवृत्तीपूर्ण सामने होणार आहेत. नगर परिषद खुलताबादचा हा उपक्रम युवकांना नवी दिशा देणारा ठरेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
















