तिलका मांझी संथाल आदिवासी जनजातील एक विद्रोही क्रांतीवीर. त्यांनी राजमहाल व झारखंड या डोंगराळ प्रदेशातील आदिवासींच्या “जल, जंगल व जमीन” या मुलभूत आधिकाराच्या रक्षणासाठी ब्रिटीशांच्या आक्रमक साम्राजशाही व विस्तारवादी धोरणाविरुध्द १७७१ ते १७८५ असा प्रदीर्घकाळ सशस्त्र विद्रोह पुकारला होता.तिलका माझींचे पुर्णनाव तिलक सुंदरा मुर्मू असे होते. व त्यांचा जन्म बिहारमधील तिलकपूर गांवातील एक संथाल आदिवासी कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील तिलकपूर गावाचे ग्रामप्रधान होते.व ग्रामप्रधान नात्याने ब्रिटिश अत्याचारात प्रथम बळी त्यांचा जात असे.
ब्रिटिशांचे हे अत्याचार बघून तिलका बालपणापासूनच विद्रोही बनला होता.१७७१ पासून त्यांनी छोटा नागपूर ते पश्चिम बंगाल पट्ट्यातील आदिवासी जनजातीच्या हक्क आणि अधिकाराच्या रक्षणासाठी ब्रिटिशांबरोबर गमिणी काव्याने लढून आदिवासींचे रक्षण केले होते.तिलका माझींची ब्रिटिशांवर ऐवढी जबरदस्त जबर बसली होती की,गोरे अधिकारी या टापूत फिरकणे बंद झाले होते. तिलकाची हि जबर पाहून स्थानिक आदिवासी अनुयायांनी आवडीचे त्यांचे टोपण नाव “जबरा पहाडियाँ” ठेवले होते.प्रसिध्द बंगाली कादंबरीकार महाश्वेतादेवी यांनी तिलका मांझींच्या जीवन-कार्यावर आधारित “शालगिरार डाके”या नावाची प्रसिद्ध कादंबरी लिहिली आहे.तर स्वातंत्र्यानंतर बिहार प्रशासनाने त्यांच्या नावाने भागलपूर मध्ये ” तिलका मांझी विश्वविद्यालय “स्थापण केले आहे.
तिलका मांझी हे भारतातील आदिवासी जन-जातीतील प्रथम सेनानी होते.१८५७ बंडाच्या पुर्वी सुमारे ८० वर्ष आगोदर त्यांनी ब्रिटिशांविरुध्द सशस्त्र बंड पुकारले होते. समोरासमोरच्या लढाईत ते ब्रिटिशांना अपराजित होते. मात्र १७८५ साली भागलपूरच्या घनदाट जंगलाचा सहारा घेऊन तिरकामठ्याच्या सहाय्याने लांबून तिलका मांझीला भेदण्यात ब्रिटिश सेनेला यश आले. व जायबंदी तिलकाला तेथेच एका मोठ्या वडाच्या झाडाला लटकावून दि. १३ जानेवारी १७८५ रोजी फाशी देण्यात आले.
तिलका मांझीला ब्रिटिशांनी घात करुन जरुर मारले ; परंतु तिलका मांझीचा विद्रोह अजूनही जीवंत आहे. आजही महाराष्ट्र ते मणिपूर या सर्वदूर पट्ट्यातील आदिवासींचा जल-जंगल-जमीनीचा लढा संपला नाही. आज जरी ब्रिटिश साम्राज्यशही भारतात नसली तरी प्रस्थापित जात-वर्गाची साम्राज्यशाही भारतात उगम पावली आहे. व तीने सातत्याने आदिवासींचे लढे दडपणे व त्यांच्या मुलभूत अधिकारांचे हनन करणे सुरुच ठेवले आहे. विकासाच्या नावाखाली आदिवासींसह सर्व भुमीपुत्रांना विस्थापित केले जात आहे.भारतात दरदिवशी कोठे ना कोठे मुलभूत हक्कासाठी जनतेला रस्त्यावर उतरावे लागत आहे. म्हणून तिलका मांझीचे स्मरण करणे समयोचित आहे.
राजाराम तुळसाबाई सूर्यवंशी.
















