गुरु रविदास साहित्य संमेलनांचा आढावा
क्रांतिकारी महामानव गुरु रविदास हे साहित्यिक होते. लेखक होते. कवी होते. समाज सुधारक होते. त्यांनी कविता लिहिल्या. त्यांनी दोहे लिहिले. एक विचारवंत साहित्यिक म्हणून त्यांनी केलेल्या या कार्याचा प्रचार प्रसार व्हावा, त्यांची परिवर्तनवादी विचारधारा सर्वांना कळावी. जातीपातीच्या भिंती तोडून वैचारिक देवाण घेवाण व्हावी हा साहित्य संमेलन घेण्याचा एक उद्देश !
दुसरे असे की गुरु रविदासानी “ऐसा चाहू राज मैं, जहाँ मिले सबन को अन्न l छोट बडो सब सम बसै, रविदास रहे प्रसन्न ll” हा राज्य समाजवादाचा सिद्धांत मांडला. याही पुढे जाऊन बेगमपूर राज्याची संकल्पना विस्ताराने समजाऊन सांगितली. या संकल्पनेला साकार करायचे असेल तर गुरु रविदासाना एका जातीपुरते मर्यादित ठेवणे योग्य नाही. त्यांच्या विचारधारेत संपूर्ण बहुजन समाज आणला तरच बेगमपूर ही संकल्पना साकार होऊ शकते, या व्यापक उद्देशाने अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलने भरविण्याचा निर्धार आम्ही केला.
पहिले साहित्य संमेलन राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दि. २ जानेवारी २०११ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे घेण्यात आले. अकोला येथील अंकुर साहित्य संघाचे अध्यक्ष ज्यांनी शंभर साहित्य संमेलने घेतली, त्यांची निवड नांदेडच्या पहिल्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनासाठी केली. त्यांनी अत्यंत आनंदाने हे पद स्वीकारले व त्यास पूर्ण न्याय दिला. अध्यक्षीय भाषणाच्या छापील पुस्तिका त्यांनी सोबत आणल्या. दैनिक सम्राट व अन्य वृत्तपत्रांनी हे भाषण सविस्तर छापले. त्यामुळे हे भाषण सर्वश्रूत झाले. सभागृहातही हे भाषण गाजले. या भाषणाची नंतर हिंदी आवृत्तीही प्रकाशित झाली.
या पहिल्या साहित्य संमेलनाला मुक्रमाबाद ता. मुखेड जिल्हा नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते व लिंगायत धर्माचे प्रचारक ॲड. शिवराजप्पा खंकरे हे सपत्निक उपस्थित होते. त्यांनी मन लावून या साहित्य संमेलनाचा आस्वाद घेतला आणि आपल्या भाषणातून सांगितले की एवढा चांगला कार्यक्रम एक दिवसाचा कसा काय ? तो किमान चार दिवसाचा असला पाहिजे !
एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी माझी दमछाक झाली होती. लोकांच्या हातातून पैसे सुटता सुटत नाहीत तर असे भव्य कार्यक्रम कसे घ्यायचे ? भोजन देण्यासाठी देखील त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते, तेंव्हा संस्था चालक व सामाजिक कार्यकर्ते श्याम निलंगेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ सभागृहाच्या जवळच असलेल्या एका खानावळीत जेवणाची व्यवस्था केली, तेंव्हा कुठे तृप्त होऊन लोकांनी साहित्य संमेलनाला चांगला प्रतिसाद दिला.
दुसरे साहित्य संमेलन मुक्रमाबाद ता. मुखेड जिल्हा नांदेड येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने घेण्याचा प्रस्ताव मा. खंकरे यांनी मांडला. कार्यक्रम स्थळ, निवास व चार दिवसाच्या भोजनाची जबाबदारी त्यांनी स्वतः स्वीकारली. मग बाकी बॅनर, पोस्टर, पॉम्पलेट, स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र, प्रसिद्धी, मानधन ही जबाबदारी मी स्वीकारली. दिनांक २६, २७, २८ आणि २९ जानेवारी २०१२ असे लगातार चार दिवसात भरपूर चर्चा झाली. सर्व साहित्यिकांचे समाधान झाले. लोकांनाही भरपूर माहिती मिळाली. मुंबईचे साहित्यिक रवींद्र बागडे हे या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी होते. ग्रामीण भागातील हे संमेलन असल्याने हाय फाय सोयी सुविधा नव्हत्या त्यामुळे आहे त्या परिस्थितीत ऍडजस्ट करणे बऱ्याच जणांना अवघड जात होते.
तिसरे दोन दिवसाचे साहित्य संमेलन १० आणि ११ नोव्हेंबर २०१२ रोजी परभणी येथे संपन्न झाले. आग्रा उत्तर प्रदेश येथील डॉ. जगदीशचंद्र सितारा हे या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. हे साहित्य होऊ नये यासाठी कांही विघ्नसंतोषी लोकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत गेले पण मी आणि संयोजक बालाजीराव जमदाडे हे खंबीर होतोत म्हणून आम्ही हे साहित्य संमेलन कमालीचे यशस्वी करुन दाखविले. नुकत्याच स्थापन झालेल्या रविदासिया धर्म संघटनेच्या अनिष्ट चालीरीती आणि कर्म कांडावर या साहित्य संमेलनात भरपूर टिका टिप्पणी करण्यात आली. त्यामुळे हे संमेलन भरपूर गाजले.
चौथे साहित्य संमेलन २४ सप्टेंबर २०१५ रोजी वामनराव पावडे मंगल कार्यालय नांदेड येथे संपन्न झाले. कालवश प्रा. भगवान भोईर (कल्याण) हे या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे स्वागताध्यक्ष होते. यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाला सोबत घेतले होते पण त्यांनी फारसे सहकार्य तर केले नाही पण संमेलन स्थळी ऐनवेळी अनावश्यक बॅनरबाजी करुन आपला फार मोठा सहभाग असल्याचे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. रविदासिया धर्म संघटनेचे बालाजी दुधन्बे यांनी या संमेलनाच्या यशस्वितेसाठी भरपूर सहकार्य केले.
पाचवे दोन दिवसीय साहित्य संमेलन ५, ६ जानेवारी २०१८ रोजी बुलडाणा येथे आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध लेखक व अभ्यासक सतनाम सिंह (दिल्ली) हे होते. सुप्रसिद्ध सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांनी हे संमेलन गाजविले. माजी मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. संयोजक म्हणून पुरुषोत्तम बोर्डे यांनी कुशल संयोजन केले होते, त्यामुळे हे संमेलन संस्मरणीय ठरले.
सहावे एक दिवसीय साहित्य संमेलन २५ डिसेंबर २०२१ रोजी हदगाव जिल्हा नांदेड या ग्रामीण भागात संपन्न झाले. अहिल्यानगर येथील सुप्रसिद्ध कवी व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे हे या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांचे काव्यमय अध्यक्षीय भाषण लक्षणीय ठरले. संमेलनाच्या यशस्वितेसाठी येथील समाज बांधवांनी भरपूर चांगले सहकार्य केले. नागोराव गंगासागर आणि सौ. अनिता गंगासागर यांनी स्वागताध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली.
सातवे साहित्य संमेलन दिनांक १० मार्च २०२४ रोजी देवकृपा मंगल कार्यालय पूर्णा रोड नांदेड येथे संपन्न झाले. कर्नाटक राज्यातील बेळगावी येथील सुप्रसिद्ध साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते कवी सुधाकर जोगळेकर उर्फ किरा बौद्ध हे या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांचे भाषण प्रचंड गाजले. छ. संभाजीनगरचे सेवानिवृत्त पोलीस उपआयुक्त बालाजीराव सोनटक्के यांनी स्वागताध्यक्ष म्हणून चांगली कामगिरी केली. निमंत्रक म्हणून नरसिंग सुर्यवंशी यांनी मोलाचे सहकार्य केले.
समाजाची काशी करुन माया कमविणाऱ्या कांही बदमाश लोकांना हे संमेलन गाजत आहे ते सहन झाले नाही म्हणून त्यांनी शेवटच्या सत्रात वीजपुरवठा खंडित करण्याचा नालायकपणा केला, त्यांना व मंगल कार्यालयाच्या मालकाला पोलिसी हिसका दाखवला पण आपल्या नालायकाने ऐनवेळी भीतीने फोन बंद करुन टाकला होता. हे संमेलन यशस्वी होऊ नये म्हणून त्याच दिवशी अन्य एका कार्यक्रमाचे आयोजन करुन त्याच्या पत्रिका वाटप करण्याचे कट कारस्थान रचण्यात आले पण तरीही हे साहित्य संमेलन प्रचंड यशस्वी झाले.
आता हे आठवे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन म्हणजे वन मॅन आर्मी या पद्धतीने मी स्वतः अतोनात परिश्रम घेऊन यशस्वी करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. माझे हक्काचे समता परिषदेचे कार्यकर्ते कुणीही नियोजनाच्या बैठकीला आले नाहित किंवा सोबत फिरत नाहीत. फोन करुन सुद्धा बोलत नाहीत. त्यांना जणू काही देणेघेणे नाही. कार्यक्रम घ्या किंवा नको घ्या, त्यांना कांही फरक पडत नाही.
त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे ते मला माहित नाही पण मी हार मानत नाही. हाती घेतलेले काम अर्धवट सोडत नाही. मान्यवर साहेब कांशीराम जी यांचे सोबत राहून तुफानाशी टक्कर देण्याची सवय झाली आहे. मी कुणावर नाराज नाही. कुणाबद्दल वैरभावना नाही. जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न करीत आहे कारण यात माझा कुठला स्वार्थ नाही. मला पैसे कमवायचे नाहीत. तो माझा उद्देश नाही. सहसा कुठे न फिरता फोन पे करुन देणगी मागितली त्यास अल्पसा प्रतिसाद मिळाला तरीही हौसले बुलंद ठेवून कार्यक्रम घेत आहे.
यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून आदिवासी युवा नेते मा. प्रवीण जेठेवाड, आयोजक म्हणून बसपाचे मराठवाडा झोन प्रभारी मा. मनिषभाऊ कावळे, निमंत्रक म्हणून समता परिषदेचे राज्य संघटक मा. उत्तम गायकवाड हे चांगले सहकार्य करीत आहेत. जमात ए इस्लामी हिंद ही संघटना देखिल खंबीरपणे पाठीशी उभी आहे. ज्यांचा माझ्या कामावर विश्वास आहे अशा देशभरातील चाहत्यांनी आवर्जून आर्थिक मदत पाठविली, त्यामुळे हे संमेलन होऊ घातले आहे.
प्रवीणभाऊ जेठेवाड हे एक कुशल संघटक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली समता परिषद कायदेशीर भक्कम करुन नव्याने बांधणी करण्यात येणार आहे. त्यामुळे येणारी संमेलने फारसी ओढाताण न करता व्यवस्थित नियमितपणे दरवर्षी पार पडतील असे नियोजन प्रवीण जेठेवाड हे लावत आहेत. नवे सवंगडी सोबत घेऊन जुन्यांना दोष न देता नवीन वाटचाल केली जाणार आहे.
















