छत्रपती संभाजीनगर, दि.१४ : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्सेस अँड टेक्नॉलॉजी’च्या वतीने ‘हॅन्ड्स-ऑन ट्रेनिंग इन मॉडर्न बायोकेमिकल टेक्निक्स फॉर एक्सपेरिमेंटल अँड प्रोजेक्ट-बेस्ड लर्निंग’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. प्रयोगाधारित आणि प्रकल्पाधारित शिक्षण पद्धतीशी सुसंगत आधुनिक बायोकेमिकल तंत्रज्ञानाचे सखोल प्रशिक्षण विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत देण्यात आले.
यावेळी, संचालिका डॉ.अर्चना पंचे, प्रा.डॉ.संजय हारके, डॉ.होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रा.डॉ.एम.व्ही.पाडुळ, डॉ.अशोक शिंदे, संशोधक चेतन डोळस, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना विविध पीएच श्रेणींमध्ये बफर तयार करण्याची प्रक्रिया, प्रथिनांचे निष्कर्षण तसेच प्रथिनांचे परिमाणात्मक विश्लेषण या तंत्रांचे प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. प्रयोगातील अचूकता आणि पुनरुत्पादकता यांवर विशेष भर देत प्रथिन शुद्धीकरणाच्या टप्प्याटप्प्याने प्रक्रिया समजावून सांगण्यात आली.
याशिवाय प्रथिनांच्या वैशिष्ट्यीकरणाच्या विविध पद्धतींची ओळख करून देण्यात आली तसेच मिळालेल्या निष्कर्षांचे डेटा विश्लेषण व त्याचे अर्थ लावण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या अनुभवाधारित आणि कौशल्यकेंद्रित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा संशोधनावरील आत्मविश्वास वाढला आहे. या कार्यशाळेसाठी साधन व्यक्ती म्हणून डॉ.होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रा.डॉ.एम.व्ही.पाडुळ आणि डॉ.अशोक शिंदे आणि यांनी मार्गदर्शन केले.
















