नळेगाव (प्रतिनिधी) : गुरु रविदासांनी भक्तीचे नाही तर मानव मुक्तीचे आंदोलन केले म्हणून गुरु रविदासांचे भक्त नाही तर अनुयायी बनावे असे आवाहन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले.
लातूर जिल्ह्यातील नळेगाव येथील दत्त मंदिर परिसरात आयोजित गुरु रविदास जयंती महोत्सवात प्रमुख वक्ता म्हणून इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर हे बोलत होते. समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव लकवाले हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थनी होते.
आपल्या भाषणात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, गुरु रविदासांनी साडेसहाशे वर्षापूर्वी समतावादी राज्याची संकल्पना मांडली. ही संकल्पना साकार करण्यासाठी गुरु रविदासांना देव बनवून मंदिरात बंदिस्त करु नका. गुरु रविदास हे देव किंवा देवाचा अवतार नव्हते. त्यांची आरती किंवा नामस्मरणात वेळ न घालवता शासन व्यवस्था आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करण्यात यावा. ज्याचे दल आहे त्याचे बळ असते. ज्याचे शासन असते त्याचे शोषण होत नाही.
शिवाजीराव लकवाले यांनी महात्मा बसवण्णा, संत हरळया, वीर कक्कय्या, गुरु रविदास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपले आदर्श असल्याचे सांगीतले. यांच्यामुळेच आज आपण चांगले जीवन जगत आहोत. यांची परिवर्तनवादी विचारधारा समजून घेऊन ती आपल्या भावी पिढीला समजून सांगावी असे आवाहन शेवटी लकवाले यांनी केले.
याप्रसंगी पांडुरंग वाघमारे गुरुजी (वडवळ), साहित्यिक माधव लांडगे (निलंगा), डॉ. श्रीपती शिंदे (खरोळा), प्रा. सोमेश्वर वाघमारे (लातूर), प्रा. कमलाकर कांबळे, कु. प्रीती वाघमारे, कु. अनुजा जाधव यांनीही आपले विचार मांडले. बाबुराव वाघमारे येरोळकर यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.
शेवटी तालुकाध्यक्ष गणेश कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका सचिव यादव कांबळे यांनी परिश्रम घेतले. स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. पांडुरंग वाघमारे यांनी यावेळी महिलाना गुरु रविदासांच्या प्रतिमेचे वाटप केले.
















