छत्रपती संभाजीनगर, दि.१८ : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या डॉ.जी.वाय.पाथ्रीकर संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात ‘ग्लिट्झ २के२६’ वार्षिक स्नेह संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या संमेलनास अभिनेते प्रविण डाळिंबकर, कुलपती अंकुशराव कदम, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, प्राचार्या डॉ. प्राप्ती देशमुख, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख डॉ.सारिका शेळके, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्राचार्या डॉ. प्राप्ती देशमुख यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयातील गुणवत्ता विकास आराखडा तसेच एनएसएस व एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी केलेली कामगिरी याबद्दल माहिती दिली.
प्रमुख पाहुणे अभिनेते प्रविण डाळिंबकर यांनी आपल्या अभिनय प्रवासातील विविध अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. संघर्ष, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर यश कसे मिळवता येते, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
‘ग्लिट्झ २के२६’ अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत, नाट्य आणि इतर कलागुणांचे आकर्षक सादरीकरण केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
















