विद्यापीठ परिसर (छत्रपती संभाजीनगर)(दि.१८) सामाजिक, राजनैतिक, सांस्कृतिक न्यायाचं उद्दिष्ट असलेल्या, राष्ट्राची पुनर्मांडणी करणार्या,जे जे मानव विरोधी आहे ते नष्ट करण्यासाठी निर्माण केल्या गेलेल्या, नव्या भारताची निर्मिती करणाऱ्या संविधानाचे संवर्धन आणि प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकांची आहे, असे आवाहन संविधान अभ्यासक आणि विश्लेषक डॉ अनंत राऊत यांनी केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आजीवन शिक्षण व विस्तार विभाग आणि विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून बुधवारी ( दि .१८) ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे संचालक डॉ.सुधाकर शेंडगे हे होते. विद्यापीठातील दोन दिवसीय व्याख्यानमालेत डॉ अनंत राऊत यांनी “भारतीय संविधानाची ७५ वर्षांची वाटचाल” या विषयावर दुसरे पुष्प गुंफले.भारतीय संविधानाच्या ७५ वर्षांच्या वाटचालीत भुके कंगाल ते आत्मनिर्भर भारत, अनेक राज्ये ते एक राष्ट्रात बांधलेला भारत,जाती-धर्मात विभागालेला ते धर्मनिरपेक्ष भारत, वंशपरंपरेने मिळणारे अधिकार ते संविधानिक अधिकार मिळवून देणारा भारत अशी संविधानाची आश्वासक वाटचाल राहिली आहे.संविधानिक मूल्य रूजविण्याचे व जपण्याचे काम युवकांनाच करावे लागेल, असे ही त्यांनी सांगितले. डॉ.सुधाकर शेंडगे यांनी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात “बहुसंख्य हिंदू असलेल्या या देशात अल्पसंख्य पंतप्रधान होतो, देशाचा राष्ट्रपती होतो, एका आदिवासी पाड्यात जन्मलेली महिला देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान होते,हे आपल्या संविधानामुळेच शक्य झाले.आजच्या युवकांनी हे संविधानिक अधिकार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम केले तर हा देश अधिक सक्षम आणि सुदृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अशोक सरवदे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ.किरण मोहड यांनी केले तर डॉ.सचिन बोराडे यांनी आभार मानले.कार्यक्रमाला डॉ.आनंद वाघ, डॉ. नंदकिशोर खिल्लारे, डॉ.खोब्रागडे यांच्या सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















