छत्रपती संभाजीनगर, दि.१८ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त व्याख्यान, शिवप्रतिमेची मिरवणूक या कार्यक्रमांचे आयोजन गुरुवारी (दि.१९ ) करण्यात आले आहे
या निमित्त छत्रपती शिवरायांच्या पुतळयापासून शिवरायांच्या तैलचित्राची मिरवणूक सकाळी ८ वाजता काढण्यात येईल. मिरवणूक नाटयगृहाजवळ आल्यानंतर सकाळी ११ वाजता मुख्य कार्यक्रम होईल. यावेळी प्रख्यात वक्ते डॉ.केदारनाथ फाळके यांचे ’शिवछत्रपतींची अर्थव्यवस्था’ या विषयावर व्याख्यान होईल. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी मा.प्रकुलगुरू डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, व्यवस्थापन परिषद सदस्य काशिनाथ देवधर, नितीन जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे यांनी केले आहे. दरम्यान, शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला विद्यापीठ नाटयगृहात शाहीर राजेंद्र कांबळे यांचा पोवाडयाचा कार्यक्रम होणार आहे.
*विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण*
छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राच्यावतीने १२ ते १८ जानेवारी दरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शिवचरित्रावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा (दि.१२), काव्यवाचन (दि.१२), दुरदृष्टीचा महामेरु : छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर वत्तृâत्व स्पर्धा (दि.१३), ’छत्रपती शिवाजी महाराजांची सर्व समावेशक कल्याणकारी निती’ या विषयावर (दि.१४ ) निबंध स्पर्धा घेण्यात येईल. तर ’छत्रपती शिवरायांच्या स्वराज निर्मितीत मावळयांचे योगदान’ या विषयावर शोधनिबंधाचे सादरीकरण (दि.१६) करण्यात आले. ’स्वराज्य निर्मितीतील व्यक्ती व घटना’ या विषयावर (दि.१८) रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. तसेच क्रीडा स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले. याच कार्यक्रमात सर्व पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यासन केंद्राचे संचालक डॉ.पुरुषोत्तम देशमुख यांनी दिली.
















