छत्रपती संभाजीनगर, दि.२०: अनुभवाचे शहाणपण सर्वात महत्त्वाचे असून आपल्याकडे एक समृद्ध भाषा असली पाहिजे.भाषा व विचाराने माणूस प्रगत झाला आहे.जगातील यशस्वी माणसे भाषेमुळेच मोठी झाली आहेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी डॉ दासू वैद्य यांनी केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे वतीने आयोजित ‘विद्यार्थी समुपदेशन व व्यवसाय मार्गदर्शन’ कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागाचे संचालक डॉ सुधाकर शेंडगे हे होते. प्रथम सत्रात प्रा.साईनाथ बोराळकर यांनी ‘ स्पर्धा परीक्षा व यशाचा मूलमंत्र’ या विषयावर बोलताना स्पर्धा परीक्षेसाठी ध्येय निष्ठा, सचोटी, सातत्य व संयम असेल तर यशस्वी होता येते असे सांगितले तर द्वितीय सत्रात प्रसिद्ध उद्योजक योगेश गावंडे यांनी ‘यशस्वी उद्योजक होण्याचा मूलमंत्र’ सांगताना उद्योजक होण्यासाठी कठीण परिश्रम, उत्तम नियोजन व सर्वसमावेशक नेतृत्व गुण आवश्यक असल्याचे सांगितले. अध्यक्षीय समारोप डॉ सुधाकर शेंडगे यांनी केला. प्रास्ताविक डॉ आनंद वाघ यांनी केले. दिवसभरात विविध सत्रात डॉ नंदकिशोर खिल्लारे, डॉ किरण मोहड यांनी सूत्रसंचालन तर डॉ अशोक सरवदे व डॉ सचिन बोराडे यांनी आभार मानले.
















