छत्रपती संभाजीनगर, दि. 20 (प्रतिनिधी)- जानेवारीनंतर हळूहळू थंडी कमी झाली असून, हिवाळा ऋतू संपला. आता उन्हाची तीव्रता जाणू लागल्याने नवनवीन आजार डोकं वर काढत आहे. ऋतू बदलानंतर सर्वच वयोगटाला या त्रासाला सामोरे जावे लागते. यासाठी आला उन्हाळा आरोग्य सांभाळा असं म्हणणं वावगे ठरणार नाही. यासाठी मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे आजार अंगावर न काढण्याचे आवाहनकरण्यात आले. बदलत्या हवामान बदलाचा आरोग्यावर गंभीर परिणामाची चिंता त्यांनी व्यक्त केली.
वैद्यकीय तज्ञ आणि डॉक्टरांच्या मते जीवनशैली ही ऋतू प्रमाणे बदलने आवश्यक आहे. या काळात उष्णतेमुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्यांची शक्यता वाढू शकते, असा इशाराही डॉक्टरांनी दिला. सध्या वातावरणातील झपाट्याने होणारे बदल, वाढते तापमान, प्रदूषण आणि उष्णतेच्या लाटा यांचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे मेडिकवर हॉस्पिटलच्या तज्ञांनी स्पष्ट केले. हवामान बदल हा केवळ पर्यावरणाचा विषय नसून, तो सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न बनला आहे, असे त्यांनी सांगितले. दैनंदिन जुनाट आजार व ताप, सर्दी, खोकला, उष्माघात आणि निर्जलीकरण यांसारख्या समस्या वाढताना दिसत आहेत. वाढत्या तापमानामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी चक्कर येणे, थकवा, रक्तदाब कमी होणे आणि गंभीर अवस्थेत उष्माघाताचा धोका निर्माण होतो. प्रदूषण आणि धुळीचे प्रमाण वाढल्याने दमा, अॅलर्जी आणि ब्रॉन्कायटिस यांसारखे श्वसनाचे आजार वाढत आहेत. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक अधिक संवेदनशील असल्याचे तज्ञांनी नमूद केले.
आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे व हलका आहार घेणे, दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणे टाळणे, मास्कचा वापर करून प्रदूषणापासून संरक्षण करणे, नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचं आहे.
या पत्रकार परिषदेत डॉ. समिध पटेल, डॉ. आनंद देशमुख, डॉ. प्रसन्न देशमुख, डॉ. आनंददीप अग्रवाल व डॉ. अविनाश कचरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपलब्ध आरोग्य सुविधांबाबत सेंटर हेड डॉ. विशाल कुटे यांनी सविस्तर माहिती दिली. नागरिकांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले.
















