छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) : विश्वबोधी महिला मंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 133 वी जयंती विश्वबोधी बुद्ध विहार नवयुग कॉलनी, भावसिंगपुरा, औरंगाबाद येथे उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी तथागत बुद्धांना लहाने काकांनी पुष्प अर्पण केले तर प्रमुख वक्ते बी. बी. मेश्राम यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पमाला अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा कांबळे मावशी यांनी प्रमुख वक्त्यांचे पुष्पहार व शाल देऊन स्वागत केले. तसेच ज्येष्ठ नागरिक वाघुले, शेळके, लहाने, जमधडे, कांबळे, देहाडे, बनकर साहेब यांचा अनुक्रमे पगारे, खिल्लारे, सरवदे, एड. शेवगावकर साहेब यांनी सत्कार केला. प्रमुख वक्ते बी. बी. मेश्राम म्हणाले की, प्रोफेसर आर्नोल्ड टोयंबी यांनी केलेल्या विश्लेषणाप्रमाणे आपण अशा देशात राहतो की ज्या देशातील अल्पसंख्याकांना सूक्ष्मदर्शकातून बघितल्यावर दिसू शकणा-या समूहाकडे सत्ता, संपत्ती व सर्व प्रकारच्या संधीची एकाधिकारशाही एकवटली आहे. कारण या देशात सामाजिक क्रांतीच्या पूर्वी राजकीय क्रांती घडवून आणली आहे. ज्यासाठी आज या देशात परिवर्तनाला गतिमान करू इच्छिणाऱ्या मान्यवर कांशीराम यांचे स्मरण केले पाहिजे कारण 14 एप्रिल 1984 ला त्यांनी या देशातील वंचित मूलनिवासी बहुजन समाजाला दुर्दशेच्या खायीतून बाहेर काढण्यासाठी बहुजन समाज पक्षाची स्थापना केली होती, ज्याचा आज वर्धापनदिन आहे. तो बहुजन समाज पक्ष उत्तर प्रदेशापुरता मर्यादित का राहिला? देशाच्या कानाकोपऱ्यात का पोहोचू शकला नाही? आरपीआयचे गटागटात विभाजन होऊन -हास का झाला याची कारणे शोधून उपाययोजना झाली पाहिजे तरच आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत निर्माण करू शकू. अन्यथा भीम के लगते जिगर, आधे इधर और आधे उधर ही परिस्थिती बदलणार नाही. करिता बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेतले पाहिजे. जेणेकरून त्यांच्या विचारांचा भारत निर्माण करता येऊ शकेल.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या शहरातील पिपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत नागसेनवन परिसरात मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली आहे. ज्या महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सोसायटी निर्माण करण्याचा उद्देश लिहिला आहे. ज्यात स्पष्ट केले आहे की, या संस्थेचा केवळ शिक्षण देणे हा उद्देश नाही तर आधुनिक भारताच्या जडणघडणीसाठी आवश्यक असणा-या विद्वान, चारित्र्य संपन्न आणि लोकशाहीचे वाहक ठरणा-या नागरिकांची निर्मिती व्हावी. हे तत्त्व जगातील सर्व शैक्षणिक संस्थांना लागू पडते. हे आपण करू शकलो काय? याची तपासणी केली पाहिजे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रानडे, गांधी आणि जीना या चर्चेत स्पष्ट केले आहे की, सर्व पंथ, पक्ष, संघटना, संस्था समोर अशी वेळ येईल जिथे त्यांची वृद्धी थांबलेली असेल, रक्तवाहिन्या सक्त झालेल्या असतील. ज्यामुळे ज्येष्ठांनी पाहिलेली स्वप्ने ही स्वप्नेच राहणार व युवकांसमोर दिशा नसेल तेव्हा इतिहासातून धडा घेऊन पुढे मार्गक्रमण केले पाहिजे. तसेच प्रत्येक समाज, संघटना आणि संस्थेत अधोगतीची स्थिती येईल तेव्हा जुने मार्ग, जुने विचार व जुन्या सवयी समाजाच्या उन्नतीसाठी अयशस्वी ठरल्यातर नव्या शोधून काढल्या पाहिजेत, अन्यथा आपले अस्तित्व संपुष्टात येईल. अशी स्थिती निर्माण झाली आहे की काय? याची शंका येत आहे. म्हणून आता मार्ग बदलले पाहिजेत. निष्क्रिय संघटनांचा त्याग करून सक्रीय संघटनात सहभागी झाले पाहिजे. अन्यथा आपल्या अधोगतीला कुणीही थांबवू शकणार नाहीत?
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, ज्या समाजात 10 डाक्टर, 20 वकील, 30 इंजिनिअर निर्माण होतील त्या समाजाकडे कुणीही डोळे वटारून बघणार नाहीत. आज समाजात शेकडो डाक्टर, वकील, इंजिनिअर व तत्सम उच्चाधिकारी हजारोंच्या संख्येने निर्माण झालेत परंतु समाजाची दुरावस्था वाढत चालली आहे. तर मग याला जबाबदार कोण याचाही शोध घेतला पाहिजे? ही परिस्थिती बदलण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपेक्षेप्रमाणे या जबाबदार व्यक्ती आपल्या उत्पन्नाचा 20 वा हिस्सा सामाजिक परिवर्तनासाठी प्रदान करीत आहेत काय? तसे होत असेल तर समाजात परिवर्तन घडवून आणता येईल, अन्यथा नाही.
आपण कार्यक्रमाचे सुरुवातीला पालीतून गाथा म्हटल्या ज्याचा अर्थ कुणाला कळला असेल असे मला वाटत नाही. तरी जनतेला कळेल अशा भाषेत अर्थ समजावून सांगितला पाहिजे, अन्यथा गाथा म्हणण्याला काही अर्थ नसेल. करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खंड क्रमांक 16 मध्ये पाली भाषेचा शब्दकोश लिहिला आहे, ते आपण समजून घ्यावे. शेवटच्या कालखंडात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपणांस धर्मांतर करून धम्माच्या झोळीत टाकले आहे. तो धम्म समजून घेऊन आचरण केले पाहिजे. करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “बुद्ध आणि त्याचा धम्म” यात मार्ग सागितला आहे. तरीही काही जण जाणीवपूर्वक, भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म असे संबोधून जनतेला अवैज्ञानिकतेकडे का वळवितात? या अनुषंगाने आपण सजग राहिले पाहिजे. जयंतीच्या अनुषंगाने “लोकशाहीच्या संवर्धनासाठी विश्वरत्न, युगपुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अनमोल संदेश” असा लेख लिहून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. ते आपण सविस्तर समजून घ्यायला हवे. अशाप्रकारे प्रमुख वक्त्यांनी सामाजिक, धार्मिक, आर्थिक व राजकीय स्थितीचे विवेचन करून मार्गदर्शन केले.
सुनिल धोंडीराम मोरे यांनी सुत्रसंचालन केले तर सिद्धार्थ गायकवाड यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमास वसाहतीतील रहिवाशांची लक्षणीय उपस्थिती होती. तसेच विश्वबोधी महिला मंडळाच्या राऊत, पगारे, कांबळे, देहाडे, खिल्लारे, पठाडे, शिंदे, खरात, वाकळे, वाघुले, जाधव ताई यांनी परिश्रम घेतले. भोजनदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.