लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांचा दि.10 जून रोजी जन्मदिन.त्या औचित्याने
सजग प्रशासक जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे
आपल्या कार्याप्रती प्रचंड निष्ठा आणि हाती घेतलेले काम नेटाने पूर्ण करायचे त्यासाठी संवाद सूत्र प्रभावीपणे वापरून कार्यक्षमतेतून गतीमान प्रशासन देणाऱ्या लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे आहेत.
वर्षा ठाकूर यांचा जन्म 10 जून 1972 चा. त्यांच्या 51 वर्षांच्या काळातील त्यांची वाटचाल माणूस म्हणून ,व्यक्ती म्हणून, सनदी अधिकारी म्हणून अतिशय दमदार, कार्यनिष्ठ आणि संवादी राहिली आहे. प्रत्येक माणसाचं एक व्यक्तित्व असतं. एक स्वतःची आयडेंटिटी असते. तशीच वर्षा ठाकूर घुगे यांची आहे.
वर्षा ठाकूर-घुगे हे नावच काफी आहे. या नावात एक सकारात्मकता आहे. हीच सकारात्मक ऊर्जा त्यांच्या संबंध आयुष्याच्या वाटचालीत दिसून येते. त्यांचे आई-वडील दोघेही नोकरीला .आई नर्सिंगला, तर वडील जिल्हा परिषदेत. डेप्युटी सी ई ओ. एकूण चार भावंडं. तीन बहिणी आणि एक भाऊ. तिघी बहिणीतल्या त्या तिसऱ्या. आईची करडी शिस्त आणि सेवाभावी वृत्ती यात त्यांची जडणघडण होत राहिली. ठरवलं ते करणार आणि यश मिळवणारच असा त्यांचा ठामपणा असे.
औरंगाबादेत बालज्ञानमंदिर शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. सरस्वती भुवनमध्ये दहावी झाली आणि दहावीला त्यांना 80 टक्के गुण मिळाले. साधारणपणे दहावीच्या उत्तम गुणांवर इंजिनियरींग किंवा मेडिकल करिअरसाठी विचार करतात पण तसा विचार त्यांनी केला नाही. बारावीला 89 टक्के गुण घेऊन त्या मराठवाड्यात कलाशाखेतून दुसऱ्या आल्या आणि बारावी नंतर राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा देऊन भोसला मिलिटरी कॉलेज नाशिकमध्ये त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले.
घरात भेद विरहित वातावरण होतं.मुलगा-मुलगी असा कधीही घरी भेद नव्हता. लहानपणापासून संपूर्ण स्वातंत्र्य आई वडिलांकडून मिळालं. कबड्डी, क्रिकेट हे त्याकाळी मुलांचे असलेले खेळ त्या खेळायच्या. गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनात हिरीरीने पुढाकार घ्यायच्या. लहानपणापासूनच नेतृत्व सिद्ध करण्याची अशी संधी त्यांना मिळाली. कॉलेजमध्ये असताना प्रशासनात जायचं हा कुठेतरी मनात विचार पक्का होत होता. बीए डिफेन्स स्टडी पदवी घेऊन औरंगाबाद मध्ये आल्यानंतर औरंगाबादमध्ये पुढील शिक्षणाची सोय नव्हती. त्यामुळे त्यांनी एम.पी. विधी महाविद्यालयात प्रवेश घेऊन लॉ पूर्ण केले. पुढे त्यांनी स्पर्धा परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात 1995 साली महाराष्ट्र शासनाच्या सेवेत उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या.
आयएएस अॅवार्ड होऊन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुजू झाल्या. या पदावर काम करेपर्यंत त्यांचा सर्वच कार्यकाळ प्रचंड गतिमान राहिला आहे. गती आणि संवेदनशीलता हा त्यांचा प्राण आहे. उपजिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी ते जिल्हाधिकारी या साऱ्याच प्रशासकीय प्रवासात त्यांची कार्यगती विकासोन्मुख राहिली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात काम करताना सगळा मराठवाडा त्यांना फिरता आला. सगळ्या जिल्ह्यांच्या भौतिक ,आर्थिक, राजकीय स्थितीचा अभ्यास झाला. हा अभ्यास प्रशासकीय गतिमानतेस पूरक ठरला.
नियोजन करणे, अंमलबजावणीची दिशा ठरविणे, विषयाचे चिंतन करून रचनात्मक पद्धतीने आखणी करणे आणि ते पूर्णत्वास जाईपर्यंत जीवाची बाजी लावणे ही त्यांची गुणवैशिष्ट्ये आहेत. त्यांनी अगदी रेखीव नियोजन करून उपक्रमांवर भर दिला. प्रत्यक्ष ग्रामीणांशी संवाद, चर्चा करून त्यांना बोलतं केले.
जीवनाकडे सुंदर दृष्टीने पहावे .निसर्ग पहावा. मनात रुतवावा. आणि या निसर्गाकडून ऊर्जा भरून घेऊन कामात सक्रीय व्हावे अशी त्यांची मनोधारणा आहे. त्यांचे पती गणेश घुगे आणि मुली शिवाणी व ईशानी, आई स्नेहलता, वडील दामोदर ठाकूर, बहिणी डॉ.कल्पना मेहता, डॉ.छाया देशपांडे, भाऊ प्रकाश, पल्लवी, नणंदा सुषमा आणि शुभदा यांच्या नात्यांनी बळकटी दिली आहे. खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, गावपातळीवर सरपंच, पुढारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी संवादी राहून लोकप्रश्न कसे सोडवता येतील यावर त्यांनी भर दिला आहे.
वर्षा ठाकूर-घुगे यांचा प्रशासकीय दिनक्रम पहाटे चार ते रात्री उशिरापर्यंत असतो. सतत प्रशासकीय चिंतन करून त्यावर मार्ग शोधण्याचा त्यांचा ध्यास त्यांच्या सह्दयी व्यक्तिमत्त्वातून दिसून आला आहे. आठ ते दहा तास नॉनस्टॉप बैठका, नॉन स्टॉप आढावा पाहताना त्यांच्या स्मरणाबद्दल चकित व्हायला होतं .
सामान्य माणूस केंद्रस्थानी माणून सुसंवादी आणि डेडलाईनमध्ये नियोजनबद्ध काम करण्याची त्यांची वृत्ती आहे. त्या सतत आव्हान लीलया पेलण्याच्या सहज वृत्तीत आणि हसतमुख असतात. म्हणून एका गतीचं किंबहुना एका उत्कृष्ट प्रशासनतत्वाचे नाव वर्षा ठाकूर-घुगे आहे. मराठवाड्यातील प्रगतिशील असलेल्या लातूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी म्हणून त्या काम करत आहेत. प्रत्येक जिल्ह्याचे एक वैशिष्ट्य असते. समस्या असतात. त्याची सोडवणूक करायची असते. तसेच लातूरचेही आहे. अतिशय दमदारपणे त्यांची ही वाटचाल सुरू आहे. सबंध जिल्हाभर झंजावाती दौरे, बैठका कामाचे योग्य नियोजन करून जिल्ह्याचे रूप एक उत्कृष्ट जिल्हा म्हणून तयार करण्याच्या कामी त्यांनी लक्ष घातले आहे. लातूर जिल्हा हा पाणीटंचाईचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष कायम कसे घालवता येईल यासाठी त्यांनी नियोजन केले आहे. त्यांच्या नेतृत्वात निश्चितच हा जिल्हा दिशादर्शक वाटचालीकडे जाईल यात शंका नाही.
-डॉ. विलास ढवळे, नांदेड