लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. सध्या ते बारामतीतल्या प्रत्येक गावात गावभेटी देत आहेत. निरावागज गावाला त्यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी गावकऱ्यांशी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केले आहे. आज केंद्र आणि राज्य सरकार आमच्या हातात नाही. काही महिन्या विधानसभेच्या निवडणुका येतील. लोकसभा निवडणुकीला झालं तसं काम झालं तर राज्य सरकार कसं हातात येत नाही मी बघतो, असे शरद पवारांनी सांगितलं आहे. त्यामुळे लोकसभेनंतर विधानसभा जिंकण्याचा निश्चय शरद पवार यांनी बोलून दाखवला आहे. बारामतीच्या निरावागजमध्ये जाहिर सभेत ते बोलत होते.
अनेकांची साथ या तालुक्याच्या राजकारणामध्ये आम्हाला मिळाली आहे. माळेगाव साखर कारखाना सुद्धा निरावागज गावासाठी महत्त्वाचा आहे. सत्ता येथे आणि सत्ता जात असते. ज्या लोकांनी आपल्याला शक्ती दिली, त्या लोकांच्या जीवनात बदल करण्यासाठी सत्ता वापरली तर लोक त्यांना लक्षात ठेवतात. गावातल्या लोकांच्या जीवनमानात बदल करण्याची जबाबदारी ही ज्याच्या हातात सत्ता आहे त्याची असते.
लोकसभेत तुमच्या सारख्या लोकांना मताचा अधिकार गाजवला. गावातल्या नेत्यांनी आतापर्यंत मोठ्यांना मान दिला किंमत दिली. पण मोठ्या नेत्यांनी तुम्हाला किंमत दिली नाही. त्यामुळे त्यांची जागा दाखवण्याचे काम सामान्य लोकांनी आणि तरूणांनी केले असे अजित पवारांचे नाव न घेता शरद पवार म्हणाले. तुम्ही तुमचं काम केलं. मी काम करा हे सांगायला आलो होतो. तुम्हाला माहिती होतं काय करायचे आहे. ते तुम्ही करून दाखवलं. आता तुमची जबाबदारी माझ्यावर आहे. तुमचे काही प्रश्न आहेत. ते सोडवण्याला प्राधान्य देणार असल्याचे शरद पवार म्हणाले.
सध्या शरद पवारांनी बारामतीतल्या प्रत्येक गावात भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यांच्याबरोबर युगेंद्र पवारही प्रत्येक गावात जात आहेत. विधानसभा निवडणुकी आधी शरद पवारांनी बारामतीत जोरदार फिल्डींग लावल्याचे बोलले जात आहे. ही अजित पवारांसाठी धोक्याची घंटातर नाही ना? असे प्रश्न आता विचारले जात आहेत. बारामतीचे किंग आपणच आहोत हे शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले आहेत. सुनेत्रा पवार यांचा पराभव केल्यानंतर ते अजित पवारांना आस्मान दाखवण्यासाठी बारामतीच्या आखाड्यात उतरले आहे.