पोलीस भरतीसाठी आलेल्या तरूणांकडून अमरावतीमध्ये आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनादरम्यान, पोलीस दलातील भरती पुढे ढकलण्याची मागणी या आंदोलक तरूणांकडून करण्यात येत आहे. राज्यात नुकतीच १७ हजार ४७१ पदांसाठी पोलीस भरती सुरू झाली आहे. राज्यातील विविध पोलीस भरती केंद्रावर पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र पावसाळा सुरू असताना कोणत्याही प्रकारची पोलीस भरती प्रक्रिया न घेता ती पुढे ढकलण्याची मागणी अमरावतीतील उमेदवारांकडून करण्यात येत आहे. मात्र सरकार भरती घेण्यावर ठाम असल्याने अमरावतीमध्ये पोलीस भरतीचे तरुण आक्रमक होत त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. काल झालेल्या पावसामुळे अमरावतीमध्ये पोलीस भरतीच्या मैदानावर चिखल झाल्याने मैदानी चाचण्या अजूनही रखडलेल्या आहेत. त्यामुळे पोलीस भरती स्थगित करून पावसाळ्यानंतर घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत एकूण 17 हजार 471 पदांसाठी पोलीस भरती प्रकिया सुरू झाली आहे. पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. परीक्षार्थी विद्यार्थी चाचणीसाठी मैदानात पोहोचले आहेत. चाचण्या सुरु झाल्या आहेत पण यामध्ये पावसाचा व्यत्यय येऊ लागला आहे. राज्यभरात थोड्याफार प्रमाणात पावसाला सुरुवात झाली असून याचा पोलीस भरतीवर परिणाम झाल्याचे दिसून येतंय. दरम्यान राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातील उमेदवार विद्यार्थी पोलीस भरतीच्या ठिकाणी पोहोचत आहेत. पावसामुळे त्यांच्या राहण्याची अडचण होत आहे. तसेच पावसामुळे पोलीस भरतीवेळी उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पाऊस आहे त्या ठिकाणी मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यापुढेही पावसाचे दिवस आहेत. त्यानंतर पुढे आचारसंहिता सुरु होईल. अशावेळी पोलीस भरतीची मैदानी चाचणी लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न राहील. कारण अनेक उमेदवारांसाठी ही शेवटची संधी असते. त्यांना ती संधी मिळायला हवी. यामुळे पाऊस असलेल्या ठिकाणी मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्याचे ते म्हणाले.
ज्या युनिट्समध्ये पाऊस नाही तिथे चाचण्या होत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच पोलीस भरतीच्या चाचणीसाठी उमेदवार दूरवरुन येतात. राहण्याची जागा नसल्याने ही मुले आपल्याला बस स्टॅण्डवर वैगेरे दिसतयात. त्यांच्यासाठी जवळच कुठे मंगल कार्यालय अशा ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन आम्ही भरती प्रक्रिया राबवणाऱ्या युनिट्सना केल्याचे ते म्हणाले.