भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झालेल्या पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन व्हावं अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात होती. २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास सुरू झाला होता. अखेर हा वनवास संपला असून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
विधान परिषदेची निवडणूक पुढील महिन्यात होत असून भाजपचे उमेदवार पाच जागांवर निवडून येतील. या जागांवर उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक नेते वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू होत्या. पक्षश्रेष्ठींना शिफारस करण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून विचारविनिमय सुरू होते. राज्यातील मराठा-ओबीसी आरक्षण वादाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह दानवे, फुके, हर्षवर्धन पाटील आदी नेत्यांच्या नावांवर विचारविनिमय केला जात होता. त्यानुसार, आज उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार, पंकजा मुंडे, योगेश तिलेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पंकजा मुंडे यांना विधानसभा किंवा विधान परिषदेसाठी उमेदवारी न दिल्यास त्यांच्या समर्थकांमध्ये असंतोष निर्माण होऊन पक्षाला मराठवाड्यात फटका बसण्याची शक्यता होती. परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे निवडून आल्याने पंकजा यांना विधानसभेसाठी कोणता मतदारसंघ द्यायचा, हा प्रश्न होता. त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार विधान परिषदेसाठी करण्यात आला. लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत पराभूत उमेदवारांना राज्यसभा किंवा विधान परिषदेसाठी उमेदवारी द्यायची नाही, हा पक्षाचा सर्वसाधारण निकष आहे. परंतु, पंकजा मुंडे यासाठी अपवाद ठरल्या आहेत.